सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी अजून काही दिवस टाळावी -प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:50 PM2020-05-03T22:50:22+5:302020-05-03T22:51:06+5:30
आगामी दिवसात नागरिकांनी अजून काही दिवस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी सार्वजनिक स्थळावरील गर्दी टाळावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.
यावल, जि.जळगाव : रावेर-यावल तालुक्यातील नागरिकांनी दक्ष राहिल्यानेच कोरोना संसर्गापासून नागरिक दूर आहेत. ही बाब दोन्ही तालुकावासीयासाठी दिलासादायक असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. आगामी दिवसात नागरिकांनी अजून काही दिवस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी सार्वजनिक स्थळावरील गर्दी टाळावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.
प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, लॉॅकडाऊन हे मुख्यत: आपल्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी आहे. याचा मुख्य उद्देश हा कोरोनाची साखळी तोडणे हा आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंचे पालन करणे, सतत हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. मागील एक महिन्यापासून आपण त्याचे तंतोतंत पालन करत आहोत.
मास्क न वापरणारे आणि आणि विनाकारण गाडीवर फिरणारे यांच्याकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड प्रशासनाने वसूल केला आहे.
परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून फैजपूर उपविभागात एक हजार रुग्णांसाठी आवश्यक सुविधांसह सेंटर उभे केले आहे.
प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्यांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या कक्षांमध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत.
सर्व डॉक्टर, पोलीस, शिक्षक, आरोग्य सेविका, आशावर्कर, प्रशासकीय यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.