चाळीसगावच्या शिरपेचात डॉ. आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:45+5:302020-12-06T04:16:45+5:30
चाळीसगावच्या शिरपेचात डॉ. आंबेडकर यांच्या सत्काराचे मोरपीस ! ६९ वर्षापूर्वी झाला होता गौरवसोहळा : महामानवाच्या पदस्पर्शाच्या स्मृती ...
चाळीसगावच्या शिरपेचात डॉ. आंबेडकर
यांच्या सत्काराचे मोरपीस !
६९ वर्षापूर्वी झाला होता गौरवसोहळा : महामानवाच्या पदस्पर्शाच्या स्मृती आजही चिरंतन
लोकमत न्यूजनेटवर्क
चाळीसगावच्या गौरव ग्रंथात १५ नोव्हेंबर १९५१ हा दिवस सुवर्णाक्षरांनी अलंकृत झालाय. याच दिवशी ६९ वर्षापूर्वी चाळीसगावच्या शिरपेचात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाही र सत्काराचे मोरपीस खोवले गेले. प्रत्येक महापरिनिर्वाणदिनी यास्मृती अधिक तेजस्वी होतात.
चाळीसगाव आणि डॉ. आंबेडकरांचे अनोखे ऋणानुबंध होते. चाळीसगावी ते तीन वेळा येऊन गेल्याचे उल्लेख त्यांनी स्वतःच केला आहे. त्यांच्या पदस्पर्शी स्मृती येथे आजही चिरंतन आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून चार वर्षी लोटली होती. स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याचे डॉ. बाबासाहेबांचे अलौकीक स्वप्नही पूर्ण झाले होते. देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहत होतेच. संपूर्ण जगात त्यांचे व्यासंगी व्यक्तिमत्व तेजाने झळाळून निघालेले. प्रत्येकालाच डॉ. बाबासाहेबांना डोळे भरुन पाहण्याची इच्छा होती. चाळीसगावकरांसाठी हा दूर्मिळ योग मात्र जुळून आला. वर्ष होतं १९५१. येथील कार्यकर्त्यांशी बाबासाहेबांचा संवाद होताच. धुळे येथे कामानिमित्त जातांना ते चाळीसगावी आवर्जून थांबत. खान्देशातील पुरणपोळी त्यांना विशेष आवडायची. घाटरोड लगतच्या दोस्त चित्र मंदिरानजीक असणा-या दिनबंधू वसतिगृहात त्यांचा मुक्काम असला की, पुरणपोळीचाच पाहुणचार व्हायचा. तितूर नदी किनारी उभारलेल्या पुतळास्थळी देखील त्यांच्या काही अस्थींचे विसर्जन करण्यात आले आहे. महामानवाच्या पदस्पर्शाची ठेव असलेले हे वसतिगृह ''''स्मृतीस्थळ'''' म्हणून विकसित करण्यासाठी २०१६ मध्ये संस्थेच्या पदाधिका-यांनी प्रस्ताव दाखल केला आहे.
........
चौकट
*खापरावरील पुरपोळीची खास आवड*
कै. दिवाण सिताराम चव्हाण, कै. शामराव भागाची जाधव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून यापरिसरात प्रसिद्ध होते. बाबासाहेब चाळीसगावी मुक्कामी असले की, कै. शामराव जाधव यांच्याकडे त्यांना पुरणपोळीचे जेवण असायचे. बाबासाहेबांना पुरणापोळी मनापासून आवडायची. जाधव यांच्या परिवारातील महिला देखील आवडीने खापरावरील पुरणपोळी बाबासाहेबांसाठी बनवत.
..................
चौकट
*''''त्या'''' सायंकाळी दुमदुमला जयघोष*
संपूर्ण देशभर स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजत होते. तळागाळातील जनतेत संघटन घडवून आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अखंड पायपीट सुरु होती. १५ नोव्हेंबर १९५१ रोजी ते चाळीसगावीही आले. याचं संधीचे सोने करतांना तालुका दलित फेडरेशनचे तत्कालिन अध्यक्ष कै. नथू दोधू जाधव व सचिव कै. राघो विठ्ठल जाधव यांनी त्यांच्या जाहिर सत्काराचे आयोजन केले. बबासाहेबांना मदत म्हणून २००१ रुपयांची थैली देण्याचे आवाहनही केले गेले.
रात्री आठ वाजता बाबासाहेब स्टेशनरोड लगतच्या सत्कार सोहळ्याच्या स्थानी पोहचले. महामानवाच्या प्रेरणादायी दर्शनाने सर्वच भारावले. ती संध्याकाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमून गेली.
आज ६९ वर्षानंतरही यासोहळ्याच्या स्मृती संस्मरणीय आहेत. त्यांच्या सत्कार सोहळ्याचे त्याकाळातील पत्रक येथील जुन्या पिढीतील काही नागरिकांनी आजही जपून ठेवले आहे.