जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा, समृध्दीने केले राजपथावर देशाचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 09:36 PM2021-01-27T21:36:35+5:302021-01-27T21:36:42+5:30
जळगाव : मुळजी जेठा महाविद्यालयातील एनसीसी युनिटची छात्र समृध्दी संत हिने प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर झालेल्या संचालनावर देशाचे नेतृत्व ...
जळगाव : मुळजी जेठा महाविद्यालयातील एनसीसी युनिटची छात्र समृध्दी संत हिने प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर झालेल्या संचालनावर देशाचे नेतृत्व केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिने संचलनात ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविले.
यावर्षी एनसीसी महाराष्ट्र डायरेक्टरेटमधून केवळ २६ छात्र सैनिकांची निवड करण्यात आली होती. अमरावती एनसीसी ग्रुप आणि १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनमधून समृद्धी एकमेव छात्र सैनिकाची निवड झाली होती. समृद्धीच्या यशामुळे जिल्ह्याच्या इतिहासात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर सैन दलाच्या व एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या परेडकडे देशाचे लक्ष असते. त्यात पथसंचलनात सहभागी होण्याचे अनेकांचे स्वप्न असतात. त्यातच समृध्दी हिला देशाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला. याबद्दल केसीई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, १८ महाराष्ट्र एनसीसे बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमन, प्राचार्य प्रो. एन.एन. भारंबे, कला शाखेचे प्रमुख आणि माजी एनसीसी अधिकारी लेफ्ट.डॉ.बी. एन. केसूर यांनी समृद्धीचे विशेष अभिनंदन केले. तसेच लेफ्ट.डॉ. योगेश बोरसे, सी.टी.ओ. गोविंद पवार, सीटीओ ज्योती मोरे, सुभेदार मेजर कोमल सिंग आणि पीआयस्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.