कोरोना काळात दहा पटीने वाढले सीटी स्कॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:31+5:302021-04-11T04:15:31+5:30
काही ठिकाणी अहवालानुसार दर : शासकीय दर फेटाळल्यास कारवाईचा प्रशासनाचा इशारालो कमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचे गांभीर्य तपासण्यासाठी ...
काही ठिकाणी अहवालानुसार दर : शासकीय दर फेटाळल्यास कारवाईचा प्रशासनाचा इशारालो
कमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचे गांभीर्य तपासण्यासाठी रुग्णांना सीटी स्कॅनचा सल्ला दिला जात असून यामुळे सीटी स्कॅनचे प्रमाण या कोरोना काळात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, काही रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांचे वेगळे व संशयितांचे वेगळे दर आकारले जात असल्याचा प्रकारही सुरू आहे. मात्र, आता शासकीय दरच आकारावे अन्यथा कारवाई करू, असा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिला आहे.
सीटी स्कॅन केल्यानंतर फुफ्फुसांमध्ये किती संसर्ग झाला आहे, याचे प्रमाण कळते व त्या दृष्टीने उपचाराची दिशा ठरविता येते. त्यामुळे आधी सीटी स्कॅन करण्याचा रुग्णाला खासगी रुग्णालयात सल्ला दिला जातो. मात्र, दुसरीकडे सर्रास सर्वांना सीटी स्कॅन आवश्यक नसल्याचेही काही तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. गेल्या महिनाभरात गंभीर रुग्णांची संख्या प्रचंड वाढली असून एका रेडिऑलॉजिस्टकडे आधी दहा सीटी स्कॅन व्हायचे तेच प्रमाण आता ६० वर पोहाेचेले आहे. दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. सीटी स्कॅनची आवश्यकता बघता सामान्य रुग्णांना ते माफक दरात उपलब्ध होण्यासाठी शासनाने काही दर निश्चित करून दिले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्याही काही तक्रारी मध्यंतरी समोर आल्या होत्या.
ग्राफ
नॉर्मल सीटी स्कॅन ५ ते १० टक्के
फुफ्फुसांमध्ये संसर्ग असलेले रुग्ण : ९० टक्क्यांपर्यंत
१० पेक्षा अधिक स्कोर असणारे रुग्ण : ३० ते ४० टक्के
शासनाने निश्चित केलेले दर
१६ स्लाईस खालील सीटी स्कॅन २०००
१६ ते ६४ स्लाईस सीटी स्कॅन २५००
६४ पेक्षा अधिक स्लाईस सीटी स्कॅन ३०००
प्रमाण वाढले
कोरोना संसर्गाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅनच्या माध्यमातून याचे निदान सोपे होत असते, त्यातच जिल्ह्यात गंभीर रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने आता सीटी स्कॅन करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. महिन्याला एकाच केंद्रावर २ हजारांपर्यंत सीटी स्कॅन होत आहेत. शहरात अशी अनेक केंद्रे आहेत. त्यामुळे महिन्यात एकत्रित वीस ते २५ हजारांपर्यंत सीटी स्कॅन होत असल्याचे चित्र आहे. यात १ ते ८ पर्यंत स्कोर हा सौम्य समजला जातो, त्यानंतर १ ते १८ पर्यंत स्कोर हा मध्यम तर १९ ते २५ पर्यंत स्कोर हा गंभीर समजला जातो. दरम्यान, संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन देण्यासाठीही घालून देण्यात आलेल्या निकषांमध्ये ९ पेक्षा अधिक स्कोर असेल तर हे इंजेक्शन वापरावे, असे डॉक्टर सांगतात.
प्रतिक्रिया
आईची तब्येत अशक्त होती. थोडा श्वास घ्यायला त्रास हात होता. ॲन्टिजेन तपासणी केली मात्र ती निगेटिव्ह आली. काही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर सीटी स्कॅन करा असे सांगण्यात आले. एका रुग्णालयात गेल्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट असेल तर २५०० हजार आणि रिपोर्ट नसेल तर ४ हजार दर सांगण्यात आले. आरटीपीसीआर तपासणी केल्यामुळे हातात रिपोर्ट नव्हते. तरीही मला ४ हजारांची मागणी झाली. मी दुसऱ्या एका केंद्रावर सिटी स्कॅनची विचारण्या केल्यावर त्यांनी सरसकट २५०० रुपयात सीटी स्कॅन करून दिले.
- रुग्णाचे नातेवाईक
कोट
सीटी स्कॅनच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधी दहा ते पंधरा व्हायचे. ती संख्या आता ५० ते ६० वर पोहाचेली आहे. यात सामान्य सिटी स्कॅनचे प्रमाण अगदी पाच ते दहा टक्के आहे. मात्र, गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक येत आहेत. सात-आठ दिवसाच्या त्रासानंतर तपासायला आलेल्या रुग्णांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत फुफ्फुसांमध्ये संसर्ग झालेला आढळतोय.: डॉ. शिवम पाटील, सदस्य, रेडिओलॉजिस्ट संघटना