खान्देशातील शेतकºयांनी असे करावे हिवाळ्यामध्ये केळी बागांचे व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:23 AM2017-11-29T00:23:27+5:302017-11-29T00:33:02+5:30
खतांचे योग्य नियोजन केल्यास राहतील उत्तम बागा
के.बी. पाटील, दि़ २८- आॅनलाईन लोकमत
जळगाव : केळी बागायतदारांसाठी चालू वर्ष अतिशय चांगले राहिले आहे़ उन्हाळ्यापासून आजतागायत केळीचे दर साधारण ९०० ते १६०० या दरम्यान राहिले, केळीची निर्यात मोेठ्या प्रमाणात झाली. उत्पादन व गुणवत्ताही चांगली मिळाली. परंतु मागील वर्षातील दुष्काळी परिस्थिती व यावर्षी पावसाला उशीर झाल्याने ज्यांच्याजवळ पाण्याची शाश्वती होती, त्यांनीच केळीची लागवड केली़ त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत लागवडी चांगल्या झाल्या, परंतु एप्रिल ते जुलै दरम्यान जास्त झाल्या. येणारा हंगाम व पुढील वर्ष चांगले राहणार असा अंदाज आहे. त्यासाठी बागांचे सध्याचे व्यवस्थापन अचूक करणे गरजेचे आहे.
निसवणाºया बागेतील एक हजार झाडांना दर दोन दिवसाआड युरिया ६ किलो, पांढरा पोटॅश किंवा सल्फेट पोटॅश ६ किलो फॉस्फरिक अॅसिड ५०० ग्रॅम किंवा १२:६१:०० १ किलो + मॅग्नेशियम सल्फेट ५०० ग्रॅम याप्रमाणे ठिबकमधून (फर्टिगेशन) द्यावे़ निसवा सुरू झाल्यानंतर निर्यातीसाठी बाग तयार करायची असल्यास केळफूल उभ्या अवस्थेत असताना व निम्मे बाहेर आलेले असताना बड इन्जेक्शन करण्यासाठी इमिडाक्लोप्रीड अर्धा मिली प्रती लीटर पाण्यात घालून ८० मिली द्रावण प्रत्येक केळफुलामध्ये इन्जेक्ट करावे. केळीचा घड पूर्ण बाहेर आल्यानंतर आणि केळीच्या फण्या मोकळ्या झाल्यानंतर केळीवरील फ्लोरेट तांबड्या रंगाचे झाल्यानंतर काढावे.
घडावर क्लोरोपायरिफॉस २ मिली प्रती लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. घडावर फक्त ८-९ फण्या ठेवाव्या. दहावी फणी पूर्ण काढावी, अकराव्या फणीत एक केळी ठेवावी व केळफूल कापावे. अकराव्या फणीत एक केळी ठेवल्याने घडाच्या दांड्याला सड लागत नाही व खालपर्यंतच्या सर्व फण्याची फुगवण चांगली होते. केळफूल तोडल्यानंतर घडावर ३० मायक्रॉनची ६ ते १० टक्के छिद्रे असलेली आकाशी रंगाची व शुद्ध एलएलडीपीईची अल्ट्राव्हायलेट ट्रिटेड स्करटिंग बॅग घालावी.
करपा नव्हे चरका़़़
अनेक केळी बागायतदार हिवाळ्यामध्ये केळी बागेला एक दोन आठवडा ठिबक सिंचन संच बंद ठेवतात. खतेसुद्धा देत नाही. पर्यायाने बाग पिवळी होते. नंतर अकाली पाने करपतात, त्याला ‘चरका’ असे म्हणतात. शेतकरी मात्र करपा रोग समजतात. पिवळ्या पांढºया मातीच्या, चुनखडीच्या जमिनीत चरक्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या बागांची जास्त काळजी घ्यावी लागते. तापमान ७ किंवा ८ अंशाला खाली आले तर बागेमध्ये १ कि. ग्रॅ. सल्फर प्रती हजारी ठिबकद्वारे महिन्यातून तीन वेळा सोडावे. बागेचा निसवा सुरू झाल्यानंतर युरिया २़५ किलो + पांढरा पोटॅश किंवा सल्फेट आॅफ पोटॅश ६ कि.ग्रॅ./ फास्फेरिक अॅसिड २५० ग्रॅम प्रती हजारी दर चौथ्या दिवशी सोडावे. लागडवडीनंतर चौथ्या महिन्यापासून कॅल्शियम नायट्रेट २़५ किलो हजारी दर आठवड्याला एक हजार झाडांना सोडावे. कॅल्शियम जमिनीत व पाण्यात जास्त उपलब्ध असल्यास सोडण्याची गरज नाही. दर आठवड्याला २़५ किलो किंवा दर चौथ्या दिवशी एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक हजार केळी रोपांना सोडावे जेणे करून थंडीचा परिणाम कमी होईल.
बागेला पाणी रात्रीच्या वेळेस व दररोज प्रती झाड २० ते २२ लीटर पाणी द्यावे़ झाडाजवळील पिले नियमित कापावी. बागेत थंड वारे शिरू नये म्हणून शेवरी, गजराज गवत लावून वाराविरोधक तयार करावे. जास्तच थंडी असल्यास बागेमध्ये ठिकठिकाणी गव्हाचा किंवा भाताचा भुसा किंवा सॉमीलमधील लाकडांचा भुसा रात्रीच्या वेळेस जाळावा, त्यामुळे १ ते २ अंश तापमान वाढते. डिसेंबर-जानेवारीमध्ये कापणी होणाºया बागांना त्वरित स्फर्टिंग बॅग घालावी जेणे करून कच्च्या केळीवर ‘चरका’ (चिलिंग इन्जुरी) येणार नाही. केळींना चिलिंग इन्जुरी झाल्यास केळीला चांगला पिवळा रंग येत नाही व केळी निर्यातीयोग्य राहत नाही.
मृग बागांचे व्यवस्थापन :
एप्रिल, मे, जून मध्ये लागवड झालेल्या बागांची वाढ आता जोमदार आहे. काही बागांची निसवन जोमाने सुरू झाली आहे. दिल्लीमध्ये थंडीची लाट आहे, त्यामुळे या बागांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास बागा थंड तापमानाला बळी पडणार नाहीत. जसे तापमान १६ अंशांपेक्षा कमी होते, तशी अन्न घटकांची उपलब्धता कमी होते. झाडांची पाण्याची गरज कमी असते. पयार्याने पिकाची वाढ मंदावते आणि त्यात काही चूक झाली तर बागेवर विपरीत परिणाम होतो. एप्रिल-मे-जून लागवडीच्या बागा पूर्ण वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत आहेत़ वाढीच्या अवस्थेतील बागेला नियमित अन्नघटकांचा पुरवठा करणे गरजेचे आहे.