सोन्यावरील कराचा थेट ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 12:20 AM2017-02-21T00:20:20+5:302017-02-21T00:20:20+5:30
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर एक टक्का टीसीएस
जळगाव : दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर एक टक्का टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स)
लावण्याच्या निर्णयाने याचा थेट फटका ग्राहकांना बसणार असून व्यवसासावरदेखील परिणाम होणार असल्याचा सूर सराफ व्यावसायिकांमधून उमटत आहे.
१ एप्रिलपासून अंमलबजावणी होणाऱ्या कराची मर्यादा सध्या ५ लाख रुपये आहे. आर्थिक विधेयक २०१७ मंजूर
झाल्यानंतर दागिनेही सामान्य वस्तूंच्या यादीत येणार असल्याने यावर एक टक्का कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीसीएससाठी ५ लाख रुपयांच्या मर्यादा घटवून ती दोन लाख रुपये करण्यात आली आहे.
कॅशलेस वाढीचा उद्देश
सरकारने हा निर्णय घेण्यामागे रोख व्यवहाराऐवजी कॅशलेस व्यवहार वाढीचा व त्या सर्व व्यवहारांची नोंद होऊ शकेल हा उद्देश असल्याचेही सांगितले जात आहे.
व्यवसायावर होणार परिणाम
ग्राहकांना या कराची झळ बसत असेल तर साहजिक ग्राहक सोने खरेदी टाळेल. यामुळे व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो. अनेक जण हौस म्हणून सोने खरेदी करीत असतात. आता याला आळा बसून गरज असेल तरच सोने खरेदी होण्याची अधिक शक्यता आहे.
ग्राहकांनाच झळ
दोन लाखाच्यावर सोने खरेदी करायची झाल्यास द्याव्या लागणाऱ्या कराची झळ थेट ग्राहकांनाच बसणार आहे. कारण १०० ग्रॅम (१० तोळे) जरी सोने घ्यायचे झाल्यास ते तीन लाखांचे होते. अनेक जण लग्न समारंभासाठी १० तोळ्याच्या वरच सोने खरेदी करीत असतात. त्यामुळे हा कर द्यावा लागणार असल्याने ग्राहकांना आता मूल्यवर्धित करासह (व्हॅट) हा करही सहन करावा लागणार आहे.
अशाही पळवाटा
दोन लाखांवर कर आकारला जाणार असेल तर तीन अथवा चार लाखापर्यंत सोने खरेदी करायचे झाले तरी ते पती-पत्नी अथवा कोणत्याही दोन जणांच्या नावाने बिल घेऊन खरेदी करीत कर चुकविला जाऊ शकतो. त्यामुळे यातूनही पळवाटा निघण्याची शक्यता आहे.
टीसीएस आकारल्याने त्याचा ग्राहकांवर बोजा पडणार आहे. आधी ही मर्यादा पाच लाखाची होती. ती घटविल्याने ग्राहकांना अधिक झळ सोसावी लागेल.
- गौतमचंद लुणिया, जळगाव जिल्हाध्यक्ष, सराफ असोसिएशन
टीसीएसमुळे ग्राहकांना तर झळ पोहचेलच शिवाय व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
- स्वरुप लुंकड, सचिव, सराफ असोसिएशन.