नववर्षाच्या स्वागतावर संचारबंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:30+5:302020-12-29T04:14:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस जवळ आल्याने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून ...

Curfew imposed on New Year's Eve | नववर्षाच्या स्वागतावर संचारबंदीचे सावट

नववर्षाच्या स्वागतावर संचारबंदीचे सावट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस जवळ आल्याने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आहे. ‘थर्टी फर्स्ट’साठी शहरात हॉटेल चालकांकडून तयारी केली जात आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी असल्याने हॉटेल, रेस्टारंट, ढाबे हे रात्री साडेदहा वाजेपर्यंतच सुरु राहणार असल्याने ‌खवय्यांसह तळीरामांनाही त्यांची बैठक त्यापूर्वीच आटोपती घ्यावी लागणार आहे. यावर्षी वेळेचे बंधन असले, तरी नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या ‘सेलिब्रिटीं’ची बैठक व्यवस्था, वाढीव मद्य, खाद्यपदार्थांचा साठा, रोषणाई, संगीत व्यवस्थेसह आणखी काही वेगळे देण्यासाठी हॉटेल मालकांकडून नियोजन करण्यात आले आहे. मात्र, संचारबंदीमुळे यावर बंधने आली असल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले. यावेळी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे. त्यातच पोलिसांना संचारबंदीविषयी अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.

नववर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबरला संगीतावर ठेका धरत एक-एक ‘घोट’ रिचवताना एक प्याला व त्यानंतर होणारे ‘खंबे’ यासाठी हॉटेल चालकांकडून येणाऱ्या ‘अशा’ ग्राहकांची विशेष सोय केली जाते. दुसरी विशेष बाब म्हणजे अनेक हॉटेलचालक मद्यपींना प्रवेश न देता, कुटुंबियांसह येणाऱ्या ग्राहकांची अधिक काळजी घेतात.

दोन वेगवेगळ्या सेवा

शहरातील काही लॉन व हॉटेलमध्ये ‘थर्टी फर्स्ट’ला दोन वेगवेगळ्या सेवांची तयारी केली जात आहे. लॉनवर खास ‘फॅमिली प्रोग्राम’ आयोजित करण्यात आले आहेत. याठिकाणी मद्य तर राहणारच नाही शिवाय मद्यपीलाही प्रवेश मिळणार नाही. लाॅनवर शाकाहारी जेवण, डी. जे., संगीत व्यवस्था करण्यात येत आहे. सार्वजनिक कार्यक्रमात महिला व सर्वांचीच सुरक्षितता महत्त्वाची असल्याने हॉटेलकडून वाढीव सुरक्षा रक्षकही तैनात राहणार आहेत. यानिमित्ताने ४० ते ४५ वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखता येणार आहेत. प्रवेशासाठी आरक्षणाचीही (बुकिंग) व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त हॉटेलच्या नियमित उपहारगृहात मद्यासह शाकाहारी व मांसाहारी जेवणाचीही व्यवस्था आहे.

काही हॉटेलमध्ये केवळ शाकाहारी जेवण मिळत असले, तरी दरवर्षी गर्दी होणाऱ्या शाकाहारी हॉटेल्समध्येही नववर्षाची तयारी करण्यात आली आहे. येथे खास ‘थर्टी फर्स्ट’साठी गार्डन तयार करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये ‘न्यू ईअर स्पेशल मेनूंची’ विविध रेंज ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

रोषणाईने उजळून निघणार हॉटेल्स

थर्टी फर्स्टसाठी काही ठराविक हॉटेल्स विशेष व्यवस्था करत असली, तरी त्यांच्यासह सर्वच हॉटेल, बार, परमीट रुमवर रोषणाई केली जाते. ३० डिसेंबरपासून याला वेग येणार आहे.

‘थर्टी फर्स्ट’साठी काही खास मेनूंचे नियोजन

काही हॉटेल्समध्ये ५०० विविध पदार्थांची मेजवानी राहणार आहे. यात पनीर तुफानी, पनीर मुसल्लम, चिकन अंगारा, चिकन रेश्मी यांचा समावेश राहणार आहे.

काही ठिकाणी तब्बल तीन दिवस म्हणजे ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी ‘न्यू ईअर स्पेशल मेनू’मध्ये पंजाबी, काॅन्टिनेंटल, साऊथ इंडियन, चायनीज पदार्थ ग्राहकांना चाखायला मिळणार आहेत.

अनेक हॉटेल चालकांनी शाकाहारी ग्राहकांची वेगळी व्यवस्था केली असून, त्यांना खास ४० ते ४५ मेनू उपलब्ध करू दिले जाणार आहेत. तसेच मांसाहारी जेवणामध्येही विविध पदार्थांचा समावेश राहणार आहे.

अनेकांकडून घरीच शाकाहारी मेनूची तयारी

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अर्थात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना अनेकजण मद्यासह मांसाहारी पदार्थांना पसंती देतात. मात्र, यंदा नेमका ‘थर्टी फस्ट’ला गुरुवार आल्याने यादिवशी अनेकांचा उपवास असतो. त्यामुळे ‘थर्टी फस्ट’ला अनेकांचा शाकाहारावर भर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक हॉटेल चालकांनी तशी व्यवस्थाही केली आहे. काहीजणांनी तर घरीच तर काही कुटुंब एकत्र येऊन घराच्या गच्चीवर गुलाबी थंडीत पाव-भाजी, भरीत-पुऱ्या, खिचडी-कढी असा शाकाहारी मेन्यूचा बेत आखत आहे.

वेळेचे मोठे बंधन, १२पूर्वीच करा स्वागत

दरवर्षी शहर व परिसरातील हॉटेल, ढाबे, रेस्टारंट याठिकाणी जोरदार तयारी केली जाते. यावर्षीही तशी तयारी केली जात आहे. मात्र, रात्रीच्या संचारबंदीने वेळेचे बंधन आले आहे. रात्री १०.३०पर्यंतच हॉटेल, ढाबे, रेस्टारंट सुरु ठेवायचे असल्याने त्यापूर्वीच खवय्यांना आनंदोत्सव साजरा करावा लागणार आहे. तर थर्टी फर्स्टचे स्वागत रात्री बारा वाजण्यापूर्वीच करावे लागणार आहे. यावर्षी वेळेचे बंधन असल्याने प्रतिसाद कसा मिळतो, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे अधिकचा साठा करावा की नाही, या विचारात हॉटेल व्यावसायिक आहेत.

एक दिवसासाठी वेळ वाढवा

थर्टी फर्स्ट म्हणजे रात्री बारा वाजता खरा जल्लोष असतो. त्यामुळे या एक दिवसासाठी तरी संचारबंदीत शिथिलता देऊन हॉटेलची वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी हॉटेल चालकांकडून होत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडेही निवेदन देण्यात येणार असल्याचे जळगाव हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात आले.

————————-

नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली जात आहे. मात्र, यावर्षी रात्रीच्या संचारबंदीत वेळेचे बंधन असल्याने प्रतिसाद कसा मिळतो, याचाही विचार केला जात आहे. परिणामी सर्वच हॉटेल चालक संभ्रमात आहेत. मात्र, खाद्यपदार्थ व इतर आवश्यक तयारी केली जात आहे.

- लेखराज उपाध्याय, अध्यक्ष, जळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशन.

‘थर्टी फर्स्ट’ला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. यावर्षी नियमांचे पालन करून सेवा दिली जाईल. मात्र, रात्रीच्या संचारबंदीमुळे वेळेचे बंधन आहे. त्यामुळे तयारी केली आहे, मात्र सर्वच हाॅटेल चालकांना वेळ वाढवून मिळण्याची प्रतीक्षा आहे.

- ललित पाटील, अध्यक्ष, जळगाव वाईन असोसिएशन.

Web Title: Curfew imposed on New Year's Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.