उत्सुकता, हुरहुर अन् शेवटी माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:17+5:302021-01-08T04:48:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : गावाच्या विकासासाठी संघटनात्मक पुढे येऊन येथील ८२ पैकी ८१ उमेदवारांनी आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : गावाच्या विकासासाठी संघटनात्मक पुढे येऊन येथील ८२ पैकी ८१ उमेदवारांनी आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणातून सामुदायिक माघार घेतली. ग्रामपंचायत निवडणूक रद्द करून नगरपंचायतची निवडणूक व्हावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी माघारी घेऊन ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची प्रतीक्षा कायमची संपुष्टात आली आहे. नगरपंचायतबाबत कार्यवाही केव्हा सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगर पंचायत रूपांतर होण्याची उद्घोषणा झाल्यानंतर निवडणुकीबाबत संभ्रमावस्था वाढतच होती. निवडणूक आयोगाकडून याबाबत कुठलाही स्पष्ट खुलासा होत नसल्याने उमेदवारांचे व नागरिकांची घालमेल होत होती. निवडणुकीचा तिढा सुटावा याकरता न्यायालयात धाव घेण्यात आली. अखेर सामुदायिक माघारी बाबत नशिराबाद येथे बैठक घेण्यात आली त्या मध्ये सर्वांनी पाठिंबा दर्शविला.
लालचंद पाटील व पंकज महाजन यांचा पुढाकार
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, मनसेचे मुकुंदा रोटे, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सय्यद बरकतअली, सुनील शास्त्री महाराज,गणेश चव्हाण ,भूषण पाटील, शिवसेनेचे विकास धनगर, चेतन बराटे, विनोद रंधे,आसिफ मुबलिक, वासिफ भाई, अब्दुल रज्जाक,शेख चॉद शे.अजिज, सचिन महाजन, ललित बराटे, प्रहार''''चे मोहन माळी,अब्दुल सय्यद अ.गनी यांच्यासह गावातील विविध पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उमेदवार यांनी परिश्रम घेतले.
सकाळपासून उमेदवारांशी संपर्क
सकाळपासूनच उमेदवारांशी संपर्क बैठकीत घेतलेल्या ठरावाप्रमाणे सर्वांनीच पाठिंबा देऊन सोमवारी दाखल केलेलं नामनिर्देशन पत्र माघारी घ्यावं यासाठी उमेदवारांना सकाळपासूनच दूरध्वनी करून संपर्क केला जात होता माघारीला उपस्थित रहा अशी विनंती केली जात होती.
संताप आणि हास्याचे फवारे
आधी तू भर मग मी पहिले ते मग मी माघारी घेईल आधी त्यांचा फॉर्म भरा सह्या घ्या नंतर मग मी करेल असे अनेक उमेदवार त्या ठिकाणी सांगत होते. त्यामुळे आधी तू नंतर मी सही करेल फॉर्म भरेल अशा उत्तरामुळे संताप व हास्याचे फवारे उडत होते. प्रत्येक उमेदवारांना माघारीसाठी एकत्र आणणे यासाठी तारेवरची कसरत चांगली झाली. काही उमेदवारांना तर घेण्यासाठी वाहनही पाठवली होती.
सकाळपासूनच मनधरणी व दमछाक
प्रत्येक उमेदवाराला गाव विकासासाठी सर्वांनी एक व्हा असे सांगितले जात होते जळगाव तहसील कार्यालयाजवळ एक एक उमेदवार एकत्र येत होते. दुपारपासून प्रत्येकाला दूरध्वनीवरून बोलवण्याचे काम सुरू होते. दुपारी एक वाजेपर्यंत निम्म्याहून अधिक उमेदवारांनी उपस्थिती देऊन गाव विकासासाठी एकत्र येत होते. मात्र पाठ फिरविणाऱ्या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी दमछाक उडत होती. काही उमेदवारांनी तर आपला दूरध्वनी बंद करून त्या ठिकाणी येण्याचे टाळत होते अखेर गावातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करून गाव विकासाची माहिती दिल्यानंतर त्यांनी होकार दर्शविला आणि माघारीसाठी उपस्थिती दिली.
अखेरच्या क्षणाला ऐतिहासिक पाऊल
सकाळपासूनच सुरू असलेल्या कार्याला यशस्वी ठरेल की नाही याबाबत प्रत्येकामध्ये उत्सुकता होती. अखेर दुपारी अडीच वाजेच्या नंतर तहसील कार्यालयामध्ये सर्वांनी माघारीसाठी प्रवेश केला. त्यातही काही जण फितूर होण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनीही गाव विकासाची सात देऊन एकी दर्शवली. शेवटच्या क्षणापर्यंत ८२ पैकी तब्बल ८१ जणांनी माघारीसाठी उपस्थिती दिली. मात्र त्यातही एका महिला उमेदवाराने सर्वांची दमछाक उडवली. अखेरच्या क्षणापर्यंत उपस्थित झाली नसल्याची माहिती मिळाली.
नशिराबादचा आदर्श जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने घ्यावा - गुलाबराव पाटील
नशिराबाद गावाच्या विकासाच्या मुद्यावरून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम आणि अपक्षांनी एकत्र येऊन शेवटच्या दिवशी माघार घेण्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद असून जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शेवटच्या दिवशी नशिराबादच्या सर्वच्या सर्व ८२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर या सर्वांचे कौतुक केले.
ईडी व बिडीपेक्षा विकास महत्वाचा
दरम्यान, नशिराबाद येथे लवकरच नगरपंचायतीची निवडणूक होणार असून तेथे विकासाचे नवीन पर्व सुरू होईल असा आशावाद देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. तसेच काही नेते ईडी व बीडीवरून वाद करत असले तरी यापेक्षा विकास महत्वाचा असल्याचा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मारला. प्रत्येक उमेदवाराचा माघारीचा फॉर्म भरून ठेवण्यात आला होता. फक्त उमेदवाराला स्वाक्षरी करणे व आधार कार्ड जोडणे इतकेच बाकी ठेवले होते.