सध्या रुग्ण संख्या जास्त, मात्र भविष्यातील संसर्गाला आळा - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:36 PM2020-05-23T23:36:56+5:302020-05-23T23:37:18+5:30
‘थ्री लेअर’ पद्धतीचा अमळनेरात यशस्वी प्रयोग
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची चाचणी करताना पॉझिटिव्ह रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासह पॉझिटिव्हचा संपर्क आलेल्या व्यक्तींच्याही संपर्कातील व्यक्तींची तपासणी हाती घेतल्याने अर्थात ‘थ्री लेअर’ पद्धतीचा अवलंब केल्याने आज रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मात्र भविष्यात यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विशेष म्हणजे ‘थ्री लेअर’ पद्धती अमळनेरात यशस्वी ठरल्याने व तेथील नागरिकांनी शिस्त पाळत सहकार्य केल्याने अमळनेर कोरोनामुक्त होऊ शकले, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्ण व संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाते. मात्र जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने त्याच्या पुढे पाऊल टाकत संपर्कातील व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात आहे व सध्या दररोज रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील माहिती दिली.
प्रश्न - एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना अमळनेर कोरोनामुक्त कसे होऊ शकले?
उत्तर - पॉझिटिव्ह रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तींचीच तपासणी न करता तीन टप्प्यांमध्ये तपासणी हाती घेण्यात आली. संपर्कातील व्यक्ती अजून इतरांनाही भेटलेली असते. त्यामुळे त्यांचीही तपासणी झाल्यास संसर्गाला आळा बसणे शक्य होते. अमळनेरात हे यशस्वी ठरले. तसेच अमळनेरकर जनतेने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिस्तीचे पालन केले. कोरोनाला रोखण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असून अमळनेरात हे सहकार्य मिळाल्याने तेथे कोरोनाला आळा बसला.
प्रश्न - जळगाव, भुसावळात अमळनेर पॅटर्न शक्य होत आहे का?
उत्तर - हो नक्कीच. अमळनेर येथे ही पद्धत अवलंबिल्याने तेथे संसर्ग थांबला. दोन आठवड्यात तेथे सकारात्मक परिणाम समोर आले. हीच पद्धत जळगाव, भुसावळ येथे राबवित आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्ण जास्त समोर येत आहे. मात्र भविष्यात या दोन्ही ठिकाणीही फैलाव रोखता येणार आहे.
प्रश्न- मृत्यू दर कमी करण्यासाठी काय करता येऊ शकते?
उत्तर- आपल्याकडे मृत्यू दर जास्त आहे, याला कारण म्हणजे नागरिक आजारी पडले तरी दवाखान्यात जात नाहीये. केवळ कोरोनाच नाही तर इतर व्याधींमुळेही मृत्यू होत आहे. नागरिकांनी काळजी घेत वेळीच दवाखान्यात गेले तर मृत्यू रोखता येऊ शकतात.
दुहेरी मानसिकतेचे दर्शन
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृत्यू सारख्या घटनेत दुहेरी मानसिकतेचे दर्शन घडत आहे. एकीकडे कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत नाही तर दुसरीकडे अंत्ययात्रेला गर्दी होते. अमळनेर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कोणी मृतदेह ताब्यात घेतला नाही म्हणून प्रशासनाच्यावतीने जळगावातच दफनविधी करण्यात आला. मात्र अमळनेर, भडगाव व इतर ठिकाणी अंत्ययात्रेला गर्दी केल्याने किती मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला, हेदेखील समोर आले. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेत गर्दी टाळावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले.
जिल्हाभरात सुविधा
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. तसेच रुग्णांचे जिल्ह्याच्या ठिकाणी येणे टाळून त्यांना जवळच सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्यात आले. धरणगाव व चोपडा येथील रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर व चाळीसगाव येथील रुग्णालय लवकरच सुरू होणार आहे.
तपासणी वाढविल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. मात्र या उपाययोजनांमुळे कोरोनाला थोपविता येणे शक्य होणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत प्रशासनाला सहकार्य केले तर आपण सर्व मिळून कोरोनावर हमखास मात करू शकू.
- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.