आव्हाणे ग्राम पंचायतीचे दप्तर सीईओंनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:01 PM2018-01-20T16:01:30+5:302018-01-20T16:05:21+5:30
तालुक्यातील आव्हाणे येथील ग्राम पंचायतीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अचानक भेट दिली. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची माहिती घेतली व ग्राम पंचायतीचे दप्तर ताब्यात घेवून गट विकास अधिकाºयांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे.
आॅनलाईनलोकमत
जळगाव,दि.२०-तालुक्यातील आव्हाणे येथील ग्राम पंचायतीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अचानक भेट दिली. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची माहिती घेतली व ग्राम पंचायतीचे दप्तर ताब्यात घेवून गट विकास अधिकाºयांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे.
आव्हाणे येथील युवकांनी ग्राम पंचायतीला सण २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षांसाठी मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्च झाला नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सीईओंनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ग्राम पंचायतीला अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरीक्त गट विकास अधिकारी गायकवाड, विस्तार अधिकारी निळकंड ढाके,पंचायत समिती सदस्य अॅड.हर्षल चौधरी, निलेश पालवे आदी उपस्थित होते. सीईओंच्या अचानक भेटीमुळे ग्रामसेवक, सरपंचासह सदस्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीची घेतली माहिती
गावातील युवकांच्या तक्रारीनुसार दिवेगावकर यांनी १४ वित्त आयोगाची संपूर्ण माहिती घेतली. तसेच यामध्ये केवळ गावात शौचालयांची दुरुस्ती व सीसीटीव्ही कॅमेरे ही दोनच कामे झाल्याचे आढळून आले. त्यामुळे इतर निधीतून कोणती कामे झाली ? असा प्रश्न विचारल्यावर ग्रामसेवकांकडून कोणतेही अपेक्षित उत्तर न मिळाल्याने सीईओंनी नाराजी व्यक्त केली. तसेच आतापर्यंत ग्रामसभा का झाली यावर देखील सरपंच व इतर सदस्यांकडून उत्तर मिळाले नाही.
युवकांनी लावली प्रश्नांची सरबत्ती
या भेटीदरम्यान आव्हाणे येथील शेकडो युवक यावेळी उपस्थित होते. गावात आतापर्यंत १४ व्या वित्त आयोगातंर्गत ३४ लाख रुपयांचा निधी आला असून, यामध्ये नागरिकांच्या हिताची कोणतीही कामे अद्याप झाली नसल्याची माहिती युवकांनी सीईओंकडे दिली. तसेच अनेकदा निवेदने देवून देखील गावात नियमितपणे ग्रामसभा होत नसल्याची तक्रार देखील युवकांनी केली. दरम्यान, युवकांच्या तक्रारीची दखल जि.प.प्रशासनाकडून घेतली जाईल, तसेच या प्रकरणी तथ्य आढळल्यास संबधितांवर कारवाईचे आश्वासन सीईओंनी दिले आहे.