पतीच्या वाढदिवसाचा केक कापून पत्नीचा गळफास ; पतीसह तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:49 PM2019-08-29T12:49:15+5:302019-08-29T12:51:11+5:30

पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या : अंत्यसंस्काराकडे माहेरच्यांनी फिरविली पाठ

Cut a husband's birthday cake and slit his wife; Murder offense against husband and wife against three | पतीच्या वाढदिवसाचा केक कापून पत्नीचा गळफास ; पतीसह तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा

पतीच्या वाढदिवसाचा केक कापून पत्नीचा गळफास ; पतीसह तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा

Next

जळगाव : रात्री १२ वाजता पतीच्या वाढदिवसाचा केक कापून भाग्यश्री प्रशांत पाटील (२६, रा.नेहरु नगर,) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री नेहरु नगरात घडली. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप करुन गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पती प्रशांत, सासरे प्रकाश पंडित पाटील व सासू प्रतिभा यांच्याविरुध्द सायंकाळी खुनाचा गुन्हा दाखल झाला. प्रशांत शनी पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील, वडील प्रकाश पाटील व आई प्रतिभा पाटील, मुलगा वेदांत व पत्नी भाग्यश्री असे मंगळवारी रात्री सर्वच जण घरात होते. २८ आॅगस्ट प्रशांत यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी पत्नी भाग्यश्री यांच्यासोबत वाढदिवसाचा केक कापला, त्यानंतर सर्व जण झोपले. रात्री १ वाजता प्रशांत यांचे वडील लघुशंकेसाठी उठले असता त्यांना सून भाग्यश्री हिने गळफास घेतल्याचे दिसले. घाबरलेल्या पाटील यांनी मुलाला उठविले. तातडीने भाग्यश्री यांना खासगी रुग्णालयात आणले व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे १.४८ वाजता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
कायदेशीर लढा लढणार : अ‍ॅड. सोनवणे
आम्हाला कुठल्याही प्रकारचे भांडण अथवा वाद घालायचा नाही. कायदेशीर पध्दतीने लढाई लढू, तिच्या अंगावरील खुणा तसेच व्रण यामुळे तिने आत्महत्या केली नसून तिला गळा आवळून मारण्यात आले असल्याचे भाग्यश्रीचे चुलत भाऊ अ‍ॅड. महेश सोनवणे यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी भारतीच्या इतर माहेरच्या नातेवाईकांनीही हीच भुमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. उशीरापर्यंत जिल्हा रुग्णालयात गोंधळ सुरु होता. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व एमआयडीसीचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी नातेवाईकांची समजूत घातली. मात्र नातेवाईक गुन्हा दाखल करण्यावर ठाम होते.

जिल्हा रुग्णालयात संताप अन् आक्रोश
मयत भाग्यश्री हिचे धुळे जिल्ह्यातील सौंदाणे माहेर आहे. एमएबीएड असे तिचे शिक्षण झाले होते. वडील अरुण जगन्नाथ पाटील, आई प्रमिला, दोन बहिणी जयश्री व राजश्री, व भाऊ निलेश असा परिवार आहे. दोन्ही बहिणी व भावाचे लग्न झाले आहे. वडील धुळयात पावभाजी गाडी लावून उदरनिर्वाह भागवितात. घटनेची माहिती मिळाल्यावर भाग्यश्रीचे हिचे शहरातील रहिवासी काका राजेंद्र पाटील यांनी नेहरुनगर गाठले. पोहचल्यावर त्यांना मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कळाले. त्यांनी याबाबत भाग्यश्रीचे वडील यासह बहिणी, मेव्हणे यांना प्रकार कळविला. त्यानुसार धुळ्यासह ठिकठिकाणांहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. मृतदेह पाहून नातेवाईकांनी सासरच्यांवर संताप व आरोप करुन प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, भाग्यश्रीचे पती प्रशांत पाटील शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत. याआधी शहर वाहतूक शाखा व तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व दत्तात्रय कराळे यांच्या काळात त्यांचे अंगरक्षक होते.

नोकरीसाठी २५ लाख मागितल्याचा आरोप
भाग्यश्री हिचे वडील अरुण जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी भाग्यश्री हिचे एम.एम.बीएड असे शिक्षण झालेले असल्याने तिला नोकरीला लावण्यासाठी प्रशांत पाटील व त्याच्या आईवडीलांनी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. ते दिले नाहीत म्हणून मुलगी भाग्यश्री हिचा छळ सुरु केला. तुला हाकलून देवू, तुला नांदवणार नाही व जीवंत ठार मारु अशा धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात होत्या. मुलगा दिनेश रक्षाबंधनासाठी भाग्यश्रीकडे आला असता तेव्हा देखील सासरच्यांनी २५ लाखाची मागणी केली होती, हे पैसे देवू शकले नाही म्हणून पती प्रशांत पाटील, सासरा प्रकाश पंडित पाटील व सासु प्रतिभा पाटील यांनी भाग्यश्री हिला गळफास लावून ठार मारल्याचे म्हटले आहे. त्यानुसार तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसापूर्वीच बहिणीशी फोनवरुन झाले बोलणे
भाग्यश्री हिची मोठी बहिण जयश्री ही चोपड्याला नांदते. ती शिक्षिका आहे. भाग्यश्री वडीलांना आप्पा म्हणायची. सोमवारी शाळेत ड्युटीवर असतांना मोठी बहिणी जयश्रीला भाग्यश्रीने मोबाईलवरुन फोन केला होता. यावेळी तिने आप्पांना माझ्या घरी पाठवून दे असे सांगितले होते, शाळेत व्यस्त असल्याने थोडेच बोलणे झाले, यानंतर भाग्यश्रीचाही फोन आला नाही, आणि मीही तिला फोन केला नाही, यानंतर बुधवारी थेट तिच्या आत्महत्येची बातमी मिळली, असे जयश्री हिने पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तिला नेमके फोनवर काय सांगायचे होते किंवा तिने आप्पांना का घरी बोलावले होते? हे प्रश्न उपस्थित करत जयश्री आक्रोश करत होती, व आप्पाला पाठविले असते तर भाग्यश्रीचा जीव वाचला असता असे बहिंणीने सांगितले.

तीन डॉक्टरांच्या समितीने केले शवविच्छेदन
दुपारी तीन वाजता वैद्यकिय महाविद्यालयातील फॉरेन्सिक पथकातील डॉ.निलेश देवराज, डॉ.शुभम पाटील व डॉ.माधुरी रोहेरा यांच्या समितीने भाग्यश्री हिचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत्यूचे कारण काय आहे, त्याचा अहवाल पोलिसांना दिला. मृत्यूचे कारण स्पष्टच असल्याने व्हिसेरा राखीव ठेवण्याची गरज भासली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अंत्यसंस्कार
रात्रीपासून मृतदेह शवविच्छेदगृहात होता. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी तीन वाजता शवविच्छेदन झाले. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता खुनाचा गुन्हा दाखल झाला. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर माहेरचे लोक निघून गेले. अंत्यविधीसाठीही कोणी थांबले नाही. सासरच्यांनी भाग्यश्री हिच्यावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.पती प्रशांत यांनी अग्निडाग दिला. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला तरी कोणालाही अटक झालेली नाही.

Web Title: Cut a husband's birthday cake and slit his wife; Murder offense against husband and wife against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.