वाळू ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:16+5:302021-04-30T04:20:16+5:30
खंडेराव नगरातील घटना : भाजीपाला घेऊन येताना अपघात फोटो जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने भाजीपाला घेऊन येत ...
खंडेराव नगरातील घटना : भाजीपाला घेऊन येताना अपघात
फोटो
जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने भाजीपाला घेऊन येत असलेल्या मेहबूब खान आफिस खान (वय ५४, रा. आझाद नगर, हुडको, पिंप्राळा) या प्रौढास जोरदार धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता खंडेराव नगर घडली. अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर घेऊन पळ काढला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्डवेअरच्या दुकानावर कामाला असलेले मेहबूब खान आफिस खान गुरुवारी सकाळी ११.३० वाजता भाजीपाला घेण्यासाठी सायकलने खंडेराव नगरात गेले होते. भाजीपाला घेऊन पिंप्राळा हुडको येथे परत जात असताना त्यांच्या सायकलीला वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच त्यांचे मित्र सैय्यद तयुब, मुलगा शाहरुख व पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. धोका लक्षात घेता ट्रॅक्टरचालक घटनास्थळाहून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला आहे. नागरिकांनी खान यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर काही वेळातच ट्रॅक्टरचालक रामानंदनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत खान यांच्या पश्चात पत्नी तस्लीम, मुलगा शाहरुख, इरफान, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
* * * * * * *दिवसरात्र वाळूचे ट्रॅक्टर सुसाट*
दिवसरात्र या परिसरातून ५० हून अधिक भरधाव वेगाने वाळूचे ट्रॅक्टर धावतात. अगदी कुठलाही विचार न करता वाळूचे ट्रॅक्टर चालक वाहन चालवितात. ट्रॅक्टर दिसले की मनात धडकी भरते. मुलांना या ट्रॅक्टरमुळे बाहेर खेळायला पाठविता येत नाही. अनेकदा बकर्यांना चिरडले. आज माणसाला चिरडले. अशा प्रकारे अपघातानंतर परिसरातील महिलांनी संताप व्यक्त केला. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली.