चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात दोघा बहिणींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:42+5:302021-05-21T04:17:42+5:30
(‘सीडी’साठी) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...
(‘सीडी’साठी)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यातील मौजे अंचलवाडी येथे चिंचेचे झाड अंगावर कोसळून दोघा बहिणींचा तर पळास खेडे येथील एका शेतकऱ्याचा या वादळामुळे मृत्यू झाला आहे. यासह जिल्ह्यातील ५०० हेक्टरवरील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात आता निसर्गानेदेखील कोणतीही कसर सोडली नसून, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात व कोकण किनारपट्टीसह जळगाव जिल्ह्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून ज्योती बल्लू बारेला व रोशनी बल्लू बारेला या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तर पळासदे येथे बांधकामातील पत्रे व विटा अंगावर कोसळून दिलीप भादूगीर गोसावी या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात सद्य:स्थितीत केळीव्यतिरिक्त शेतांमध्ये कोणतेही पीक नसल्याने शेतीचे फार नुकसान झाले नसले तरी जळगाव, चोपडा तालुक्यातील काही गावांमधील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या कांदे बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे शेतात ठेवलेला चारादेखील ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील विद्युत खांब व तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच फिडरवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जळगाव, अमळनेर, चोपडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये २४ ते ३२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.