आपत्कालीन स्थितीत प्रत्येक कक्षात सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:22+5:302021-04-23T04:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ऑक्सिजन समितीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ऑक्सिजन समितीचा आढावा घेऊन ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सक्षम असल्याबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक वॉर्डात सिलिंडर लावण्यात आलेले आहेत. तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन विभागाच्या तीन युनिटमध्ये ठेवलेल्या साधे व जम्बो ऑक्सिजन सिलिंडर हाताळणीची कार्यप्रणाली तंत्रज्ञांनी अधिष्ठातांना दाखविली.
सकाळी ११ वाजता ऑक्सिजन समितीतील सदस्य डॉ. इम्रान तेली, संजय चौधरी यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना ऑक्सिजन टॅंकजवळ नेऊन टॅंक कसा वापरला जातो, त्याची दैनंदिन तपासणी कशी होते, याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णालयातील विविध वॉर्डात ऑक्सिजन पुरवठा कसा होतो, ऑक्सिजन पाईपलाईनचे कामकाज कसे चालते, त्याचीदेखील माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी घेतली.
ऑक्सिजन समितीच्या मदतीसाठी २ तंत्रज्ञ व ८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. ही टीम कायम ऑक्सिजन पुरवठ्यावर नजर ठेवून तो सुरळीत करीत असल्याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.