डीमार्ट चौकाचे सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:20 AM2017-08-03T00:20:23+5:302017-08-03T00:26:20+5:30
कामाचे भूमिपूजन : दोन महिन्यात काम पूर्ण होणार
आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.२- डीमार्ट नजीकचा चौक व खुल्या भुखंडाचे सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते झाले. हे काम आता येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. काव्यरत्नावली चौकाकडून, इच्छादेवी मंदिराकडून, शिरसोली रोड ते डिमार्ट या तीनही मार्गांवर प्रचंड वर्दळ असते. या जवळच महापालिकेचा एक खुला भुखंड बखळ अवस्थेत पडून आहे. या ठिकाणी अतिक्रमणेही वाढली होती. या चौकाचे व बखळ जागेचे सुशोभिकरण करावे म्हणून मनपातर्फे जैन उद्योग समुहास आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनीही सहकार्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा चौक व खुल्या भुखंडाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतरही या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, याची काळजी मनपाला घ्यावी लागणार आहे. भुमिपूजन सोहळा बुधवारी सकाळी चौकाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा नारळ वाढवून महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. या भुमिपूजन सोहळ्यास नगरसेवक सदाशिव ढेकळे, सादीक खाटीक, जैन उद्योग समुहाचे अधिकारी दिक्षीत, मनपा उपअभियंता विजय मराठे व नागरिक उपस्थित होते. अशी होणार कामे या ठिकाणी आकर्षक दुभाजक, दोन्ही बाजुने तीन मिटरचा पाथ वे, चौकाचे सुशोभिकरण व ओपन स्पेसचे सुशोभिकरण केले जाणार आहे. हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण केले जाईल असे नितीन लढ्ढा यांनी सांगितले.