बाबा म्हणायचे, ‘कार्यकर्ते हाच आमचा पहिला परिवार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 10:54 PM2019-12-09T22:54:44+5:302019-12-09T23:04:08+5:30
आम्ही बाबांना म्हणायचो की, आमचा दुसरा परिवार आहे. पण पहिला परिवार कार्यकर्ते, सामाजिक बांधिलकीचा होता. तेही तसे म्हणायचे : भैरवी पलांडे
अमळनेर, जि.जळगाव : गेल्या २८ नोव्हेंबर आम्ही मोठ्या दु:खात गेलो. आम्ही बाबांना म्हणायचो की, आमचा दुसरा परिवार आहे. पण पहिला परिवार कार्यकर्ते, सामाजिक बांधिलकीचा होता. तेही तसे म्हणायचे. तो अनुभव आपण या १३ दिवसांत अनुभवला. माझे बाबा मोठा समाज जोडून गेले, पण नुसते वाघ गेले, पण सगळे वाघ तयार करून गेले. त्यांचे स्वप्न सर्वांनी पूर्णत्वास न्यावे,’ अशी भावना स्व.उदय वाघ यांची ज्येष्ठ कन्या भैरवी पलांडे हिने अत्यंत गहिवरून श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी येथे सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली. शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सायंकाळी चारला झालेल्या या शोकसभेत सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शोकसभेच्या व्यासपीठावर आमदार सुधीर तांबे, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, पंचायत समिती सभापती वजाबाई भिल, पारोळा येथील सुरेंद्र बोहरा, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, डॉ.अनिल शिंदे, अॅड.ललिता पाटील, कामगार नेते रामभाऊ संदानशिव, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, हरी भिका वाणी, अर्बन बँक चेअरमन पंकज मुंदडे, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुलोचना वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, धुळे जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, शांताराम ठाकूर आदी उपस्थित होते. शोकसभेत उदय वाघ यांची कन्या भैरवी पलांडे, जावई अपूर्व पलांडे, दुसरी कन्या इशाणी आदीही व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
यावेळी श्रद्धांजलीत गौरव माळी या तरुणाने कविता रूपात आपली भावना मांडली. रासपच्या ज्योती भोई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, पंचायत समितीच्या वतीने अनिल पाटील, मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनेच्या वतीने गुलाबराव बोरसे, बाजार समितीचे सचिव उन्मेष राठोड, राष्ट्रवादीतर्फे शेतकी संघ माजी अध्यक्ष संजय पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, धनगर पाटील, वकील संघातर्फे अॅड.तिलोत्तमा पाटील, खा. शि. मंडळ संचालक नीरज अग्रवाल, अर्बन बँकेच्या वतीने वसुंधरा लांडगे, आयएमएच्या वतीने डॉ.अनिल शिंदे, मंगळग्रह संस्थान पत्रकार संघ लायन्स क्लबच्या वतीने डिगंबर महाले, अमळनेर फोटोग्राफर असोसिएशनतर्फे महेंद्र पाटील, मुस्लीम समाजातर्फे आरिफ भाया, जिल्हा व पारोळा तालुका भाजपतर्फे सुरेंद्र बोहरा, अनंत निकम, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, तळवाडे येथील रामकृष्ण पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, तर पोलिसांतर्फेेदेखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.