वडील जेवणासाठी घरी जाताना दिसले, आणि काही मिनिटांतच आला अपघाताचा फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 08:40 PM2020-12-26T20:40:32+5:302020-12-26T20:40:48+5:30
ट्रॅक्टरच्या धडकेत मनपा कर्मचारी ठार : शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावरील घटना
जळगाव : जेवणासाठी घरी निघालेल्या मनपा कर्मचारी नारायण मांगो हटकर (५८, रा. तांबापुरा, ह.मु. नंदनवन कॉलनी) यांचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महामार्गावरील शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावर घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रॅक्टरचालक पसार झाला.
नंदनवन कॉलनीत नारायण मांगो हटकर हे कुटुंबीयांसह वास्तव्यास होते़ ते महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडे पाणी सोडण्याची जबाबदारी होती़ शनिवारी सकाळी कामावर हजेरी लावल्यानंतर त्यांनी दुपारी कोल्हेनगर परिसरातील नळांना पाणी सोडले. हे काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एमएच.१९.बीई.३१०८) जेवणासाठी नंदनवन कॉलनीतील घरी जाण्यासाठी निघाले. शिवकॉलनी स्टॉप ओलांडल्यानंतर उड्डाण पुलावरून जात असताना त्यांना भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक हा घटनास्थळावरून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.
बहिणीसोबत जात असताना अपघाताचा आला फोन..
मयत नारायण हटकर यांचा मुलगा पवन हटकर हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. दुपारी पवन हा सुद्धा शहरात काही कामानिमित्त येण्यासाठी बहिणीला घेऊन नंदनवन कॉलनीतून निघाला होता. शिवकॉलनी स्टॉपजवळून जात असताना त्यास वडील जेवणासाठी घरी जात असल्याचे दिसून आले. पण, काही अंतर कापल्यावर मुलगा पवन याला वडिलांचा अपघात झाल्याचा फोन आला. पवनने तातडीने रिक्षा वळवली व अपघातस्थळी धाव घेतली. वडील जखमी पडल्याचे दिसताच मुलगी आशा आणि मुलगा पवन यांनी त्वरित जखमी अवस्थेत त्यांना रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांची वाटेतच प्राणज्योती मालवली होती. जिल्हा शासकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. त्यानंतर मृत्यू झाल्याचे कळताच, त्यांनी एकच हंबरडा फोडला. नारायण हटकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
अपघातांची मालिका सुरूच
शहरातून जाणारया महामागावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यात महामार्गावरील रस्त्यांची झालेली दुर्दशा व खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. गुरुवारी देखील बॉम्बे बेकरीजवळ ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. एक दिवसानंतर पुन्हा आता शिवकॉलनी पुलावर अपघात होऊन मनपा कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील रस्त्यांसह महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.