श्रीक्षेत्र कनाशी येथे ‘दाढ’ विशेष दर्शन व यात्रोत्सव निर्बंधांमुळे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:40+5:302021-07-19T04:12:40+5:30

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेले श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेस ‘दाढ’ विशेषाच्या दर्शन सोहळ्यानिमित्त भाविकांना ‘दाढ’ दर्शनास ...

'Dadh' at Shrikshetra Kanashi closed due to special darshan and pilgrimage restrictions | श्रीक्षेत्र कनाशी येथे ‘दाढ’ विशेष दर्शन व यात्रोत्सव निर्बंधांमुळे बंद

श्रीक्षेत्र कनाशी येथे ‘दाढ’ विशेष दर्शन व यात्रोत्सव निर्बंधांमुळे बंद

googlenewsNext

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेले श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेस ‘दाढ’ विशेषाच्या दर्शन सोहळ्यानिमित्त भाविकांना ‘दाढ’ दर्शनास ठेवण्यात येत असते. ही यात्रा २३ व २४ जुलैला होती. मात्र, कडक निर्बंधांमुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे येथील मंदिरदेखील बंद राहणार असून, गुरुपौर्णिमा, दाढ विशेष व यात्रोत्सव हे सारेच बंद करण्यात आले आहे. तसे पत्र कनाशी-देव्हारीच्या सरपंच लीलाबाई पाटील, मनीषा पाटील यांनी भडगावचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना दिले आहे. यामुळे हजारो भाविकांना लागोपाठ दुसऱ्या वर्षी दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. दरवर्षी येथे दर्शनासाठी देशविदेशातून पन्नास हजारांच्या वर भाविक येतात.

या ‘दाढ’ विशेषाची आख्यायिका अशी आहे की, बाराव्या शतकात पूर्ण परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जीर्णोद्धारासाठी अवतार धारण केला. ते कलियुगातील श्रीकृष्णाचेच अवतार मानले जातात. श्री चक्रधर स्वामींचा जन्म गुजरातमध्ये झाला असला तरी त्यांनी महाराष्ट्र हीच आपली कर्मभूमी मानून आपल्या परिश्रमाने महाराष्ट्राला धर्मभूमीचे व मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान त्यांनी प्राप्त करून दिले. या थोर अवतारी युग पुरुषाने पायी भ्रमण करून शांती, समता, सहिष्णुता व मानवतेची शिकवण दिली.

गोदावरी परिसरातून स्वामींचे कनाशी येथे आगमन झाले. गावातील ब्राह्मणाच्या विनंतीवरून स्वामी त्यांच्या घरी गेले. ब्राह्मणाने मनापासून स्वामींची सेवा केली. सेवेमुळे प्रसन्न होऊन स्वामींनी त्यांना संतती, संपती व ऐश्वर्य संपन्नतेचा वर दिला. त्यामुळे आजही येथे येणारे व जाणारे भाविक श्रद्धेने नतमस्तक होऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात.

एकदा चक्रधर स्वामींचे गुरू परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंनी वार्धक्य अवस्थेत हलणारी दाढ हाताने काढली व समोर बसलेल्या येल्हाईसा ऊर्फ साधा या साध्याभोळ्या साध्वीला ‘घे मेली घे ना’ आपल्या नेहमीच्या शैलीत बोलून प्रसन्नतेने दिली. श्री नागोव्यास खामनीकर या सिद्ध पुरुषांची कवीश्वर कुलाचार्यपदी नियुक्ती झाल्यानंतर दाढेचा विशेष त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, तेव्हापासून श्री खामणीकर पिढीमध्ये दाढेचा विशेष आला आहे. त्यामुळे भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. पूर्वीपासून येथे अनेक साधू-संतांचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने कवीश्वर कुलाचार्य प. पू. प. म. श्री. खामनीकर बाबांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. त्यांच्या दर्शनाने मन:शांती लाभते. मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा आजही विश्वास आहे. त्यामुळे महानुभाव परंपरेत या दाढ विशेषाचे फार महत्त्व आहे.

कडक निर्बंधांमुळे मंदिर बंद

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत. यामुळे श्रीक्षेत्र कनाशी येथील मंदिरदेखील बंद आहे. या तीर्थस्थळी गुरुपौर्णिमेच्या ‘दाढ’ विशेषाला भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, गेल्या मार्च २०२० पासून मंदिर बंद असल्याने भाविक दर्शनासाठी आतुर झाले आहेत.

180721\18jal_8_18072021_12.jpg

सन २०१९ मध्ये गुरुपौर्णिमेस दर्शना साठी झालेली भाविकांची गर्दी

Web Title: 'Dadh' at Shrikshetra Kanashi closed due to special darshan and pilgrimage restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.