देवकर यांचा खर्च २२ लाख, खडसे यांचा १ लाख ३४ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 03:02 PM2019-04-15T15:02:35+5:302019-04-15T15:03:25+5:30

निरीक्षण नोंदवही : उन्मेष पाटील यांचा ८ लाख, डॉ. उल्हास पाटील यांचा दीड लाख रु. खर्च

daevakara-yaancaa-kharaca-22-laakha-khadasae-yaancaa-1-laakha-34-hajaara | देवकर यांचा खर्च २२ लाख, खडसे यांचा १ लाख ३४ हजार

देवकर यांचा खर्च २२ लाख, खडसे यांचा १ लाख ३४ हजार

Next


विजयकुमार सैतवाल ।
जळगाव : १७ व्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर असून उमेदवारांच्या खर्चाचा ताळेबंद निवडणूक विभागाने तयार केला आहे. निरीक्षण नोंदवहीनुसार जळगाव लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा खर्च सर्वाधिक २२ लाख ५४ हजार ९३० रुपये झाला आहे तर युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांचा खर्च ८ लाख ७५ हजार ७५६ रुपये झाला आहे.
रावेर मतदार संघातही आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा खर्च एक लाख ४३ हजार ८३५ रुपये तर युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा खर्च एक लाख ३४ हजार ९९५ रुपये झाला आहे. दरम्यान, खर्चाच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीही मागे नसून जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार अंजली बाविस्कर यांचा खर्च हा २६ हजार ४८९ झाला आहे.
दुसरीकडे ज्या उमेदवारांनी खर्च सादर केला आहे तो खर्च व निरीक्षण नोंदवहीतील नोंदीतील खर्चात मोठी तफावत आहे. मात्र उमेदवारांचा वाहनावरील खर्च तथा अन्य तत्सम खर्च निवडणूक विभागाने नोंदवल्यामुळे निरीक्षण नोंदवही आणि प्रत्यक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या नोंदीत तफावत आहे.
मात्र अंतिम खर्च सादर करताना छोट्या-मोठ्या खर्चासोबतच सूक्ष्म खर्चाचा विचार करून त्यांचा मेळ घालण्यात येईल, असे निवडणूक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ प्रमाणेच यंदाही ७० लाखांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना १० हजार रुपयापर्यंतचा खर्च रोखीने करण्यास संमती देण्यात आली आहे.
यापेक्षा होणारा अधिकचा आर्थिक व्यवहार हा उमेदवारांना रोखीने करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने बजावले आहे.
दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघातील आघाडी व युतीच्या उमेदवारांसह माघार घेतलेले व इतर उमेदवार असे ११ जणांनी आपला खर्च सादर केलेला नाही.
उमेदवारांना नोटीस
निवडणुकीसंदर्भात खर्च सादर करण्यासंदर्भातील बैठकीस उपस्थित नसलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघातील दोन तर रावेर मतदार संघातील ११ उमेदवारांना जिल्हा निवडणूक विभागाने नोटीस बजावली असून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
वाहनांवरील खर्च जादा
उमेदवारांचा प्रामुख्याने वाहनावरील खर्च तूर्तास जादा असल्याचे निवडणूक विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. निरीक्षण नोंदवहीनुसार जळगाव लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा खर्च २२ लाख ५४ हजार ९३० असला तरी प्रत्यक्षात त्यांनी ८ लाख ७९ हजार ४४४ रुपये खर्च झाला असल्याचे म्हटले आहे. युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनाही निरीक्षण नोंद वहीतील खर्च अमान्य असल्याचे सांगण्यात आले.
रावेरमध्ये खर्च सादर नाही
रावेर लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा निरीक्षण नोंद वहीनुसार १ लाख ४३ हजार ८३५ रुपये खर्च झाला आहे तर युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचाही निरीक्षण नोंद वहीनुसार खर्च एक लाख ३४ हजार ९९५ रुपये खर्च झाला आहे. मात्र या दोन्हीही उमेदवारांच्या प्रत्यक्ष नोंदवहीत हा खर्च नमूद नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: daevakara-yaancaa-kharaca-22-laakha-khadasae-yaancaa-1-laakha-34-hajaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.