दहिगाव, म्हसावद बंधारा ओव्हर फ्लो!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:58 PM2023-12-18T14:58:14+5:302023-12-18T14:59:02+5:30
गिरणेचे पहिले आवर्तन आज कानळद्यात पोहोचणार.
कुंदन पाटील, जळगाव : यंदा पिण्यासाठी गिरणा धरणाचे चार आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पहिले आवर्तन सोडल्यानंतर जामदा, म्हसावद बंधाऱ्यात आवर्तनाच्या पाणी अनुक्रमे रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी पोहोचले. मंगळवारी आवर्तनाचे पाणी कानळद्यापर्यंत पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पहिल्या आवर्तनात १५०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहेत. गुरुवारी आवर्तन सोडल्यानंतर जामदा कालव्यात पाणी पोहोचले. हा कालवा भरुन झाल्यावर पाण्याचा प्रवाह एरंडोल तालुक्यात रविवारी पोहोचले. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता दहिगाव बंधारा पूर्णत: भरला. त्यामुळे ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा प्रवाह सोमवारी सकाळी म्हसावद बंधाऱ्यात पोहोचले. सकाळी साडेदहा वाजता हा बंधारादेखील तुडुंब भरला. त्यानंतर बांभोरीच्या दिशेने पाण्याचा प्रवाह यायला सुरुवात झाली आहे. कांताई बंधारा भरल्यानंतर पाण्याचा प्रवाह कानळद्याच्यादिशेने आगेकूच करणार आहे.
वाळूमाफियांचे खड्डे अडचणीचे
अवैधरित्यात वाळूचा उपसा करणाऱ्या माफियांमुळे गिरणा नदी पात्रात भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह या खड्ड्यांना भरल्यानंतर पुढे जात आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत कानळद्यात पोहोचणारे पाणी मंगळवारी दुपारनंतर पोहोचणार आहे. तसेच या खड्ड्यांमुळे गिरणा नदी पात्रात पाणीही तुंबून राहणार आहे.
पिण्यासाठी सोडलेल्या आवर्तनामुळे ११८ गावांची सोय होणार आहे. या पाण्याचा सिंचनासाठी वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गिरणाकाठी यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
-देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.