एस.टी.चे रोजचे उत्पन्न एक कोटीचे, जळगाव राज्यात पुन्हा अव्वल
By सुनील पाटील | Published: June 14, 2023 08:38 PM2023-06-14T20:38:46+5:302023-06-14T20:38:53+5:30
शिरपेचात मानाचा तुरा : मुख्यमंत्र्यांकडून विभाग नियंत्रकांचा गौरव
जळगाव : एस.टी.महामंडळाच्या जळगाव विभागाने महाराष्ट्रातील सर्व विभागांना मागे टाकत दररोजच्या उत्पन्नाचा एक कोटीचा आकडा पुन्हा पार केला आहे. जळगाव विभाग पुन्हा राज्यात अव्वल आला आहे. या कामगिरीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांचा बुधवारी मुंबईत विशेष सत्कार करुन गौरव केला.
उपलब्ध आकडेवारीनुसार महिनाभराच्या उत्पन्नानुसार सरासरी दरदिवसाला एस.टी.चे उत्पन्न एक कोटी पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. याला आजपर्यंतचा उच्चांक समजले जात आहे. लग्नसराईची धामधूम, महिला प्रवाशांना सवलत व ७५ वर्षे वयावरील वृद्धांना विनामूल्य प्रवास दिल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढले आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे जळगाव विभागाचा अव्वल क्रमांक आला आहे.
जामनेर आगराचा राज्यात दुसरा क्रमांक व चोपडा आगाराचा राज्यात नववा क्रमांक आला आहे. यानिमित्ताने बुधवारी मुंबईत एका विशेष कार्यक्रमातमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, जामनेर आगाराचे आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे, चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांचा सत्कार केला. याप्रसंगी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, एसटी महामंडळाचे ब्रँड अँबेसिडर मकरंद अनासपुरे उपस्थित होते.