जळगावात 200 मोबाईलची दररोज विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:05 AM2017-09-25T00:05:48+5:302017-09-25T00:07:02+5:30
ऑनलाईन खरेदीही जोरात : सवलती तसेच नवीन सुविधांचा घेतला जातोय लाभ
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - नवरात्रोत्सवात वाहन व इतर वस्तूंच्या खरेदीसह मोबाईल खरेदीकडेही कल वाढला असून यासाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. कंपन्यांकडून विविध सवलती दिल्या जात असल्याने तसेच नवनवीन सुविधा (फिचर्स) येत असल्याने तरुणाईदेखील याचा जास्तीत जास्त फायदा घेताना दिसत आहे. नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून शहरात दररोज 200 ते 250 मोबाईलची विक्री होत आहे.
नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात नवीन वस्तू खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. त्यामुळे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याने बाजारपेठेत चैतन्य आहे. आता दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांच्यासह मोबाईललादेखील मोठी पसंती वाढली आहे.
नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच मोबाईलला मोठी मागणी वाढली आहे. पहिल्या दिवशी तर 200 मोबाईलची विक्री झाली. अद्यापही विक्री जोरात सुरू असून दररोज तेवढय़ाच प्रमाणात मोबाईल विक्री होत असल्याचे चित्र आहे. विविध सवलतीदेखील दिल्या जात असल्याने मोबाईलच्या विक्रीत भर पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवसेंदिवस मोबाईलमध्ये तंत्रज्ञानामुळे विविध अत्याधुनिक सुविधा (फिचर्स) येत आहेत. यामध्ये पूर्वी असलेल्या केवळ एक ते दोन जीबी रॅम ऐवजी आता 4 जीबी रॅम येण्यासह 64 जीबी इंटरनल मेमरीर्पयत क्षमता वाढविल्याने याचा लाभ घेण्याकडे कल दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्या सेल्फीचा जास्त ट्रेंड असल्याने कॅमेराचे पिक्सल वाढविण्यात आले आहे. 24 मेगा पिक्सल कॅमेरा, बॅटरीची वाढीव क्षमता, मोठा डिस्प्ले, फिंगर स्कॅनर याला अधिक पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
ऑनलाईनवरदेखील मोबाईल खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात सवलत दिली जात असल्याने त्याद्वारेही मोबाईल खरेदीला पसंती असल्याचे चित्र आहे.
नवरात्रोत्सवामुळे मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. कंपन्यांकडून विविध सुविधा दिल्या जात असल्याने तसेच नवनवीन फिचर्समुळेही यात भर पडत आहे. दसरा-दिवाळीर्पयत गर्दी कायम राहू शकते.
- नीलेश पाटील, श्री इलेक्ट्रॉनिक्स.