एमआयडीसीतील दाळ मिलला आग; दहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:37+5:302021-03-18T04:16:37+5:30
जळगाव : एमआयडीसीतील ई-सेक्टरमध्ये असलेल्या एस.एस.एंटरप्राइजेस या दाळ मिल कंपनीला बुधवारी रात्री साडेसात वाजता अचानक आग लागली. यात ...
जळगाव : एमआयडीसीतील ई-सेक्टरमध्ये असलेल्या एस.एस.एंटरप्राइजेस या दाळ मिल कंपनीला बुधवारी रात्री साडेसात वाजता अचानक आग लागली. यात बारदाना, कच्चा मूग,इलेक्ट्रिक साहित्य आदीसह एकूण आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
एमआयडीसीतील ई-सेक्टरमध्ये ६३ क्रमांकाच्या प्लॉटमध्ये डॉ. सत्यनारायण बादली यांच्या मालकीची ही कंपनी आहे. बुधवारी सायंकाळी कामगार कंपनीत काम करत असताना अचानक गोदामातून आगीचे लोळ बाहेर पडताना त्यांच्या नजरेस पडले. यावेळी कामगारांनी धाव घेऊन मालक बादली यांना घटनेची माहिती देऊन शेजारील संजय व्यास यांच्या कंपनीतील बोअरिंगच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.अग्निशमन दलालाही घटना कळविण्यात आली, त्यानंतर त्यांचे दोन बंब घटनास्थळावर दाखल झाले होते. साधारणतः अर्धा तास हे तांडव सुरू होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत प्रथमदर्शनी आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मालक बादली यांनी लोकमतला सांगितले.