सततच्या पावसाने सडून कपाशीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 03:59 PM2020-08-21T15:59:51+5:302020-08-21T16:01:19+5:30
गेल्या १० दिवसांपासून सततच्या पावसाने उडीद, मूग, शेंगा सडून कपाशीची फुलपाती गळत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
दहिगाव, ता.यावल, जि.जळगाव : येथे व परिसरासह तालुक्यात गेल्या १० दिवसांपासून सततच्या पावसाने उडीद, मूग, शेंगा सडून कपाशीची फुलपाती गळत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या पिकांचे पंचनामे त्वरित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परिसरात गेल्या आठवड्यापासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जोरदार पावसाची अपेक्षाच आहे. परिसरातील नागादेवी तलाव, निंबादेवी धरण अद्यापही भरलेले नाही. त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र रिपरिप पावसाने शेत शिवारातील कांदा पीक रोप, उडीद व मूग यांच्या शेंगा सडून त्यावर कोंब आलेले आहेत. त्यामुळे येणारे उत्पन्न पूर्णपणे हातून जाणार आहे.
दरम्यान, कपाशीची फुलपातीही गळण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा झालेला खर्च या उत्पन्नात निघणे अवघड आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी असून त्यात आणखी भर पडलेली आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वच बाजारभाव महागले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शेतकरी व मजूर व्याकूळ झालेले आहेत. शासनाने या ठिकाणचे त्वरित पंचनामे करावे व शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.