भिजपावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 09:55 PM2019-09-16T21:55:42+5:302019-09-16T21:55:58+5:30
जळगाव : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सततच्या भिजपावसामुळे पिकांचे नुकसान होऊन पाऊस पडूनदेखील पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
जळगाव : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सततच्या भिजपावसामुळे पिकांचे नुकसान होऊन पाऊस पडूनदेखील पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
चोपडा : तालुक्यात पंधरा दिवसांपासून असलेल्या अतिवृष्टीने मूग, उडीद आदी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. सततच्या भिजपावसाने मातीच्या धाब्याच्या घरांना गळती लागली आहे. त्यामुळे अशा घरात रहाणे ग्रामस्थांना धोक्याचे वाटू लागले आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र भिजपाऊस सुरू आहे. त्यामुळे कापूस पिकाला फवारणी केली जात नसल्याने त्यावर मावा, तुडतुडे व किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारा कापूस पिक धोक्यात आहे. लष्करी आळीने मका पिकावर जोरदार प्रादुर्भाव झाल्याने ही पिके शेतकऱ्यांच्या हातून जाताना दिसत आहेत. तसेच सततच्या पावसाने पक्व झालेले मूग, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मूग, उडिदाच्या शेंगांमधून कोंब बाहेर येत आहेत.
मजुरांच्या हाताला नाही काम, रोजीरोटीचा प्रश्न
हाताशी आलेली पिके जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूरही हवालदिल झाले आहेत. शेतीची कामे खोळंबली असून मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मजुरांना हाताला काम नसल्याने ते रिकामे आहेत. एकंदरीत सततचा भिज पाऊस नुकसानीचा ठरत आहे. शेतकरी उघडीप होण्याची वाट पाहत आहेत.
कांद्याला सर्वाधिक फटका
अडावद, धानोरा, बिडगावसह परिसर हा कांदा उत्पादक परिसर आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने कांदा लागवडीच्या हेतुने शेतक-यांंनी महागडे बियाणे घेऊन रोप तयार करण्याठी साठी नर्सरी टाकल्या होत्या. मात्र बुरशीजन्य रोग पडून ६० ते ७० टक्के रोपे कुजून गेली. त्यामुळे कांदा लागवडीला ब्रेक लागला. थोडीफार लागवड झाली होती. मात्र तीही वाया जात आहे. तर नविन लागवडीसाठी रोपे मिळणे कठीण झाले आहे.