जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ३५० हून अधिक हेक्टर क्षेत्रावर नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:06+5:302021-05-31T04:14:06+5:30
जळगाव : शनिवार, २९ मे रोजी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर, चोपडा, यावल, बोदवड, एरंडोल तालुक्यात शेतीपिकांचे ...
जळगाव : शनिवार, २९ मे रोजी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर, चोपडा, यावल, बोदवड, एरंडोल तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पाच तालुक्यांमध्ये ३५०.३३ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली असून सर्वाधिक फटका केळीला बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान रावेर तालुक्यात झाले असून त्याखालोखाल यावल तालुक्यात नुकसान झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसत असून गुरुवारी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्यानंतर शनिवारी पुन्हा अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने पाच तालुक्यांत नुकसान झाले.
रावेर तालुक्यात सलग नुकसान
शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर तालुक्यात १८९ हेक्टर क्षेत्रावरील केळीचे पीक नष्ट झाले. यासोबतच यावल तालुक्यात १२१.०४ हेक्टर, एरंडोल तालुक्यात २७ हेक्टर चोपडा तालुक्यात १० हेक्टर व बोदवड तालुक्यात २.५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये रावेर तालुक्यात गुरुवारी ७५७.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे पीक भुईसपाट झाले होते. त्यानंतर पुन्हा शनिवारी रावेर तालुक्याला चक्रीवादळाने घेरले व त्यात पुन्हा केळीच्या पिकाला फटका बसला.
पाच तालुक्यांतील ४२ गावे बाधित
शनिवारच्या चक्रीवादळामध्ये रावेर तालुक्यातील १४, चोपडा तालुक्यातील चार यावल १५, बोदवड पाच, एरंडोल चार अशा एकूण ४२ गावांमधील ३५१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
सर्वाधिक केळीचे क्षेत्र
शनिवारी केळी, पपई, पेरू, लिंबू, डाळिंब, या पिकांचे नुकसान झाले. यात ३२१.५५ हेक्टर वरील केळी, सात हेक्टरवरील लिंबू, २.१८ हेक्टरवरील डाळिंब व पेरू तसेच पपई यांचे प्रत्येकी एकेक हेक्टरवर नुकसान झाले आहे. या सर्व पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांवर आहे.
या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पहिला अहवाल शासनाला सादर होत नाही, तोच दुसरा फटका गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी शासनाकडे सादर केला. हा अहवाल सादर होत नाही, तोच पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पाच तालुक्यात नुकसान झाले.