मुसळधार पावसाने कांद्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:52+5:302021-09-26T04:18:52+5:30
किनगाव : यावल तालुक्यातील चिंचोलीसह पश्चिम भागातील आडगाव, कासारखेडा, किनगाव, डांभुर्णी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ...
किनगाव : यावल तालुक्यातील चिंचोलीसह पश्चिम भागातील आडगाव, कासारखेडा, किनगाव, डांभुर्णी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल प्रशासन विभागाने पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी बांधवांनी केली आहे.
आधीच कर्ज काढून लहान- मोठ्या शेतकरी बांधवांनी खरिपाची पेरणी केली. महागाची खते व बियाणे जमिनीत टाकले. यंदा तरी वरुणराजा पावेल व कर्जाच्या खाईतून सुखरूप बाहेर येईल, अशी आशा शेतकरी धरून बसला होता; परंतु ऐन हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची दैना थांबायचे नावच घेत नसल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.
चिंचोली परिसरात कापसाचे पन्नास टक्के, तर कांदा पिकाचे साठ ते सत्तर टक्के नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे लागवड केलेला कांदा पूर्णत: खराब झाला. कापसाचे पीक लाल पडून खराब झाले असून, शेतात फक्त कापसाच्या काड्याच दिसत आहेत. सोयाबीनची पानेही गळून फक्त सडलेल्या शेंगा तग धरून आहेत. अजून दोन-चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीनही हातचे वाया जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उडीद, मूग तर तोडण्यासाठी मजूरच न मिळाल्याने शेतकऱ्यांना उडीद शेतातच सोडून द्यावा लागला. एवढे मोठे नुकसान होऊनही शासनाने अद्याप महसूल विभागाला पंचनामे करण्याचा आदेश दिला नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात शासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकरीबांधवांच्या हिताचा निर्णय घेत निदान ज्या शेतकरी बांधवांचे कापूस, कांदा, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी किनगाव व चिंचोली परिसरातील शेतकरीबांधवांनी केली आहे.