वृक्ष संवर्धनासाठी अमळनेरात दामदुप्पट वृक्ष योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 07:16 PM2019-06-13T19:16:30+5:302019-06-13T19:17:52+5:30
जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने अमळनेर शहरातील विविध शाळांना झाडांची रोप व ट्री गार्डचे वाटप करण्यात येऊन एक महिना जगवल्यास त्याच्या दुप्पट रोपे व ट्री गार्ड देण्यात येणार आहेत.
अमळनेर, जि.जळगाव : जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने अमळनेर शहरातील विविध शाळांना झाडांची रोप व ट्री गार्डचे वाटप करण्यात येऊन एक महिना जगवल्यास त्याच्या दुप्पट रोपे व ट्री गार्ड देण्यात येणार आहेत.
तापमानाचे वाढते प्रमाण व पाण्याची भीषण टंचाई यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. यासाठी वृक्षांची झालेली मोठ्या प्रमाणात कत्तल हे प्रमुख कारण आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी व राष्ट्रहित जोपासत जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जय योगेश्र्वर माध्यमिक विद्यालय, सरस्वती विद्या मंदिर, इंदिरा गांधी विद्या मंदिर, जी.एस.हायस्कूल, डी.आर.कन्या शाळा, पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल, लोकमान्य विद्यालय, नवीन मराठी शाळा यासह इतर सामाजिक संघटनांना झाडांची रोपे व त्यांच्या संरक्षणासाठी ट्री गार्डचे वाटप करण्यात आले. ज्या शाळांनी झाडे जगवली त्यांना पुढीक महिन्यात दुप्पट झाडे व रोपे देण्यात येणार आहेत.
यावेळी संस्थेचे संचालक पराग पाटील, प्राचार्य प्रकाश महाजन, प्रशासन अधिकारी अमोल माळी, डी.डी.पाटील, प्रा.लीलाधर पाटील, प्र.ज.जोशी, रणजीत शिंदे, संदीप पवार, के.डी.सोनवणे, देवरे, भूषण पाटील, हेमंत वाघ, नरेंद्र वारुळे, दत्तू पाटील, विजय धोत्रे, जितेंद्र पवार, मोहन चौधरी, रवींद्र कोळी, कुणाल पाटील आदी उपस्थित होते.