‘दामोदर, सृष्टी, शाश्वत’चा राज्यात ‘अंक’नाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:37+5:302021-09-02T04:33:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि मराठी भाषा विकास संस्था मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि मराठी भाषा विकास संस्था मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती. यात ए. टी. झांबरे विद्यालयातील दामोदर चौधरी व सृष्टी कुळकणी तसेच प. वि. पाटील विद्यालयातील शाश्वत कुळकर्णीने बाजी मारली आहे.
ही स्पर्धा बालगट ते पहिली, दुसरी ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी, आठवी ते दहावी, खुला गट आणि शासकीय कर्मचारी अशा सात गटांमध्ये घेण्यात आली होती. स्पर्धेमध्ये पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे यांचे पाढे एक ते शंभरपर्यंत पाठ करून विद्यार्थ्यांनी म्हटले. दामोदर धनंजय चौधरी याने खुल्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून रुपये ११ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले. तसेच सृष्टी कुलकर्णी हिने वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक पटकावून रुपये ११ हजार रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र पटकाविले. तसेच प. वि. पाटीलचा विद्यार्थी शाश्वत विशाल कुलकर्णी याने सुध्दा पहिली ते दुसरीच्या गटातून द्वितीय क्रमांक पटकावून रुपये सात हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. या विद्यार्थ्यांना केसीई सोसायटीतर्फे प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी मंत्रालयात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या विद्यार्थ्यांना महेंद्र नेमाडे यांचे मार्गदर्शन लाभले.