कथ्थक नृत्य रुजविणारे नृत्यगुरू यादवेंद्र लांभाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:50+5:302021-06-06T04:12:50+5:30
नृत्यगुरू कै. यादवेंद्र लांभाते यांनी खान्देशात अभिजात संगीताचे रोपटे रुजवले. अर्थात त्यांचा विषय हा कथ्थक नृत्य होता. ज्या ...
नृत्यगुरू कै. यादवेंद्र लांभाते यांनी खान्देशात अभिजात संगीताचे रोपटे रुजवले. अर्थात त्यांचा विषय हा कथ्थक नृत्य होता. ज्या काळात ते जळगावात आले तेव्हा शहरात नृत्य हा प्रकारच नव्हता. लांभाते सर हे इंदूर ही आपली मायभूमी सोडून जळगाव शहरात आले आणि इथलेच बनले. स्थानिक अनेक कलावंतांना भेटले त्यांनी कथ्थक नृत्य शिकविण्याची आपली इच्छा व्यक्त केली.
तेव्हा त्यांना शशिकांत राजदेरकर आणि प्रा. रमेश लाहोटी व इतर मंडळी भेटली आणि नृत्य शिकण्यास कोण उत्सुक आहे अशा व्यक्तींची सरांशी भेट घालून दिली. त्या काळी नृत्याचे शिक्षण घेणारे तसे खूप कमी होते. दोन-तीन विद्यार्थी घेऊन त्यांनी आपले कथ्थक नृत्य प्रशिक्षण सुरू केले. आणि हळूहळू ते रोपटे आज मोठा वटवृक्ष तयार झाले.
लांभाते सर यांनी नृत्याचे शिक्षण जयपूर घराण्याचे अधिकारी व्यक्ती पं. दुर्गाप्रसाद यांच्याकडून घेतले त्यानंतर आपले ज्येष्ठ गुरुबंधू डॉ.. पुरू दाधीच यांच्याकडे त्यांनी कथ्थक नृत्याचे धडे आत्मसात केले. विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी जयपूर घराण्यातील नृत्याचे सर्व प्रकार व वैशिष्ट्ये शिकविली. लांभाते सर हे लयकरी आणि फरमाईशी व चक्रदार परण तोडे बनवण्यात पारंगत होते. त्याचप्रमाणे त्यांना सतार, हार्मोनियम, तबला व शास्त्रीय गायन या विषयातही खूप सखोल अशी माहिती होती. त्यांनी जळगाव शहरात झंकार संगीत विद्यालय स्थापन केले.
त्यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून कमीत कमी दोन ते तीन हजार विद्यार्थी कथ्थक नृत्यात तयार केले. त्यापैकी दोन विद्यार्थिनी डॉ.अपर्णा भट व डॉ.महिमा मिश्रा यांनी डॉक्टरेट केली तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी नृत्यात रचना लाहोटी यांच्यासोबत अनेक विद्यार्थी एम.ए. झाले बरेच विद्यार्थी विशारदसुद्धा झाले. दोन विद्यार्थी दिल्ली कथ्थक केंद्रासाठी पाठवले, त्यात स्मिता बागूल व प्रकाश करकरे, तसेच भुसावळ येथून मुकेश खपली, धुळे येथून नरेंद्र जाधव, शीतल शेंद्रे चाळीसगाव येथे अरकडी यांनी आपले नृत्याचे प्रशिक्षण पूर्ण केले.
जळगावात आजही संजय पवार, डॉ. महिमा मिश्रा, ॲड.स्मिता चौधरी, डॉ. अपर्णा भट असे अनेक विद्यार्थी त्यांच्या कथ्थक नृत्याचा वारसा चालवित आहेत.
त्याकाळी त्या तबला संगत श्रीराम भावसार करीत असत. सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. उल्लेखनीय म्हणजे आग्रा, बनारस व कटनी येथील स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे.
सरांचे कथ्थक नृत्यात भाव अंगावर प्रभुत्व होते तसेच लोकनृत्यामध्येसुध्दा त्यांची पकड होती. त्यांनी भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील प्रसिद्ध लोक नृत्य विद्यार्थ्यांकडून बसून घेतले आसामातील बिहू, राजस्थानातील घूमर, कालबेलिया, रुमाल तसेच महाराष्ट्राची लावणी, गोंधळ ,बांबू नृत्य असे अनेक नृत्य त्यांनी विद्यार्थ्यांकडून बसवून घेतले.
खानदेशातील संगीत परंपरा ही देश व देशाच्या बाहेरपर्यंत पोहोचावी यासाठी ते प्रयत्न करीत असत. अखंड संगीतमय जीवन जगणारे यादवेंद्र लांभाते सर यांनी खान्देशासाठी केलेले कार्य नक्कीच स्मरणात राहिल.