पाणी उपशाविरोधात हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:27 AM2017-03-24T00:27:39+5:302017-03-24T00:27:39+5:30
लोणी : अधिका:यांना सांगूनही दुर्लक्ष होत असल्याने महिलांचे आंदोलन
पारोळा/ लोणी बु.।। : लोणीसीम मध्यम प्रकल्पावर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पंप ठेवून अनधिकृत पाण्याचा उपसा करीत आहेत. यावर प्रशासन कुठलीही कारवाई करीत नसल्याने लोणी बु.।।, लोणीसीम, लोणी खुर्द येथील सुमारे 70 महिलांनी संभाव्य पाणीटंचाई होण्याची चिन्हे पाहता 23 रोजी सकाळी 11 वाजता मध्यम प्रकल्पावर हंडा मोर्चा नेला.
लघु सिंचन पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या लोणी मध्यम प्रकल्पावरून धुळपिंप्री, लोणी बु.।।, लोणी खुर्द, लोणीसीम, पळासखेडे, बाहुटे, फरंकाडे या गावांची पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी हा प्रकल्प 80 टक्केच भरलेला होता. मात्र या ठिकाणाहून काही शेतकरी अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करीत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वरिष्ठांना कळविले. तरीदेखील दखल घेतली जात नसल्याने गुरुवारी महिलांनी मध्यम प्रकल्पावर हंडा मोर्चा काढून आंदोलन केले. यात पुरुषांनीही सहभाग घेतला होता. संभाव्य पाणीटंचाई पाहता या धरणातून होणारा पाण्याचा उपसा तत्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी केली. या वेळी लोणी बु.।।च्या सरपंच अनिता प्रेमराज भिल, उपसरपंच वासुदेव गुलाब पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, लोणी खुर्दचे सरपंच सुरेखा गोकूळ पाटील, उपसरपंच नगराज पाटील, माजी सरपंच श्रीराम देसले आदी सहभागी झाले होते.
लोणीसीम मध्यम प्रकल्पातून अनेक गावांना पाणीपुरवठा होतो.मात्र या मध्यम प्रकल्पातून काही शेतकरी पाण्याचा अवैधरित्या उपसा करीत असल्याने पाणी टंचाईची महिलांना भीती आहे.
4 या अवैधरित्या पाणी उपसाबद्दल अधिका:यांना सांगूनही काहीच कारवाई होत नसल्याने, अखेर गावातील महिलांनी या मध्यम प्रकल्पावर मोर्चा नेऊन आपला निषेध नोंदविला.