धोकादायक परिस्थिती मातांना दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:22 AM2021-02-17T04:22:00+5:302021-02-17T04:22:00+5:30
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मातामृत्यू रोखण्यात डॉक्टरांना यश आले असून विशेष म्हणजे कोरोनासारख्या महामारीत या रुग्णालयात ...
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मातामृत्यू रोखण्यात डॉक्टरांना यश आले असून विशेष म्हणजे कोरोनासारख्या महामारीत या रुग्णालयात १६१ महिलांनी बालकांना जन्म दिला. यात २०२० मध्ये सहा मातांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. मात्र, गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला एप्रिलमध्ये पूर्णत: कोविड घोषित करण्यात आले होते. कोविडचा प्रादुर्भाव अधिक असल्याने अशा स्थितीत अन्य रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता आणि बाधित मातांना कोविड रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूतीआधी तपासणीची अट टाकण्यात आली होती. त्यामुळे मध्यंतरी रुग्णांचे हाल झाले होते.
जीएमसीच्या डॉक्टरांना यश
कोरोनाच्या काळात १६९ महिलांची यशस्वी प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे यात १२ दिवसांच्या एका बाळालाही लागण झाली होती. त्या बाळाला निगेटिव्ह करून सुखरूप घरी पाठविण्यात आले होते. खान्देशात सर्वाधिक प्रसूती या जीएमसीत नोंदविल्या गेल्या. यातील एका महिलेचा मृत्यू झाला. अन्य सर्व माता व बालकांना घरी सुखरूप पाठविण्यात आले.
कुठल्या महिन्यात किती प्रसूती
जानेवारी - सामान्य : ४१०, सिझर : १६५, मृत्यू ३
फेब्रुवारी - सामान्य : ३७०, सिझर : १३१, मृत्यू १
मार्च - सामान्य : ३००, सिझर : १४५, मृत्यू १
डिसेंबर - सामान्य : ६९, सिझर ४८, ००
कोविड
एप्रिल ते डिसेंबर
पॉझिटिव्ह सिझर : ६३, मृत्यू १
पॉझिटिव्ह सामान्य : ५०
संशयित सिझर : १८
संशयित सामान्य : ३०
२०२० मध्ये प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेल्या महिला
सिझर : ४८९
सामान्य : ११४९
मृत्यू : ६
रक्ताची कमतरता धोकादायक
महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असणे, हिमोग्लोबिनची कमतरता असणे, शिवाय प्रसूतिपश्चात होणारा रक्तस्राव यांमुळे महिलांचा मृत्यू होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासह उशिरा रुग्णालयात येणे हेदेखील एक कारण समोर येत आहे.
कोट
रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिन कमी असणे या बाबी महिलांसाठी धोकादायक ठरू शकतात. शिवाय अनेक वेळा महिलांना बाहेरील रुग्णालयांनी पाठविलेले असते. त्या गंभीरावस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येत असतात, हेही मृत्यूचे कारण असते. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी झाले आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- डॉ. संजय बनसोडे, स्त्रीरोग विभागप्रमुख