सातपुड्याून धोकाग्रस्त रानकुत्र्यांची २० वर्षांनंतर नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:16 AM2021-05-20T04:16:56+5:302021-05-20T04:16:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा धोकाग्रस्त, दुर्मिळ पक्षी, वनस्पती, प्राणी यांच्या अस्तित्वासाठी वरदान ठरत आहेत. अशाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा धोकाग्रस्त, दुर्मिळ पक्षी, वनस्पती, प्राणी यांच्या अस्तित्वासाठी वरदान ठरत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण रानकुत्रे म्हणजेच भारतीय ढोल या संकटग्रस्त सस्तन प्रजातीची वन्यजीव संरक्षण संस्थेच्या राहुल व प्रसाद सोनवणे या वनस्पती व पक्षी अभ्यासकांना तब्बल २० वर्षांनंतर नोंद घेण्यात यश आले आहे.
जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा अनेक दुर्मिळ व संकटग्रस्त प्रजातींसाठी महत्त्वाचे आश्रयस्थान आहे. जिल्ह्यात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, पाणमांजर, खवलेमांजर, तडस, कोल्हे, लांडगे अशा सर्वच महत्त्वपूर्ण प्रजातींचे अस्तित्व आहे. नावीन्यपूर्ण दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी प्रजाती या भागातून नोंदवल्या जात आहेत.
रानकुत्र्यांची वैशिष्ट्ये
रानकुत्रे हे जंगली कुत्रे, ढोल, कोलसारा, कोलसा अशा नावांनी ओळखले जातात. रानकुत्रे समुहात राहणारे प्राणी असुन पाळीव कुत्र्यांपेक्षा आकाराने मोठे असतात. उंची सुमारे ४०-६० सेंमी, लांबी सुमारे १.२-१.५ मी असते. पुर्ण वाढलेल्या नराचे वजन २० किलोपर्यंत असू शकते. मादी वजनाने कमी असते. त्याच्या शरीराचा रंग साधारण मातकट लालसर असतो. कान टोकाकडे गोलसर असून शेपूट केसाळ, टोकाकडे काळी व झुपकेदार असते. लांडग्यांप्रमाणेच त्यांचे माेठमाेठे कळप असतात. कळपात१०-१२ ते ३०-४० कुत्रे असू शकतात. कधी कधी रानकुत्रे जोडीनेसुद्धा हिंडताना आढळून येतात. हरीण, काळवीट, नीलगाय, ससे हे त्यांचे नेहमीचे खाद्य आहे. भुकेलेल्या जंगली कुत्र्यांनी माेठी रानडुकरे, गवे, बिबट व वाघांवरही हल्ला करून ठार केल्याची उदाहरणे आहेत. संघटनशक्ती, गतिशीलता, निर्भयपणा ही रानकुत्रांच्या शिकारीच्या पद्धतीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. मुख्यत्वे मांसाहारी असुनही रानकुत्रे क्वचित रानफळेही खातात.
कोट..
रानकुत्र्यांची भारतीय वनांतील संख्या २५०० पर्यंत आहे. नुकत्याच प्रसिद्ध होणाऱ्या रेड डाटा बुक मध्ये रानकुत्र्यांच्या सद्यस्थितीची नोंद म्हणजे धोकाग्रस्त म्हणून केलेली आढळते. त्यामुळे धोकाग्रस्त असलेल्या भारतीय वाघांप्रमाणेच रानकुत्र्यांच्याही संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
- प्रसाद सोनवणे, वनस्पती व पक्षी अभ्यासक (वन्यजीव संरक्षण संस्था)
मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र, यावल अभयारण्य, यावल वनविभागातील मनुदेवी, देवझिरी, वैजापूर ही जंगल वढोदा-अनेर व्याघ्रसंचार मार्गाचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहेत. वाघ, रानगवे, रानकुत्रे यासारख्या प्राण्यांना अशाच विस्तृत जंगलाची आवश्यकता असते. या प्राण्यांचे जिल्ह्यात आढळणे हे जिल्ह्यातील वनांची गुणवत्ता व वढाेदा-अनेर व्याघ्रसंचारमार्गाचे अनन्यसाधारण महत्त्व विषद करणारे आहे.
-राहुल सोनवणे, वनस्पती व पक्षी अभ्यासक, (वन्यजीव संरक्षण संस्था)
रानकुत्र्यांसारखे दुर्मिळ, संकटग्रस्त प्राणी आढळणे हे नक्कीच आपल्या जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. परंतु त्यासोबतच आपल्या सर्वांच्याच जबाबदारीत वाढ झाली आहे.
-रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक, जळगाव