डांगरीला खळ्याला आग, तीन लाखाचे शेती साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 08:15 PM2020-12-05T20:15:37+5:302020-12-05T20:16:35+5:30
डांगरी येथील खळ्याला आग लागून शेती साहित्य,जनावरांचे खाद्य, खतांच्या गोण्या यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथील खळ्याला आग लागून शेती साहित्य,जनावरांचे खाद्य, खतांच्या गोण्या यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले असून दोन म्हशी भाजल्या आहेत.
डांगरी येथे ५ रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास अचानक भीमराव नामदेव शिसोदे यांच्या खळ्याला आग लागली. आगीने काहीवेळात रौद्ररूप धारण केले. गावातील टँकर व नागरिकांनी मिळेल, ते साहित्य घेऊन पाणी मारणे सुरू केले. आग आटोक्यात येत नव्हती, म्हणून अमळनेर नागरपररिषदेचा अग्निशामक बंब मागवण्यात आला. नितीन खैरनार, फारुख शेख, आनंदा झिम्बल, आकाश बाविस्कर, वसीम पठाण यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीत बैलांचे औत, शेतीचे लाकडी साहित्य, चारा, ढेप, मक्याचा भरडा, ठिबक नळ्यांचा संच, तीनशे पाईप, केबल, खतांच्या गोण्या, औषधी, पत्र्याचे शेड आदी तीन लाखाचे साहित्य जळून खाक झाले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत आग धगधगत होती. वेळीच खळ्यातील जनावरे सोडण्यात आली. मात्र दोन म्हशी भाजल्या आहेत. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.