कळमडूच्या कन्येची ‘डेअरिंग’, हाती बसचे स्टेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:56 PM2020-02-17T12:56:09+5:302020-02-17T12:56:20+5:30

असाही योग : पतीपाठोपाठ पत्नीनेही घेतला ‘लालपरी’च्या सारथ्याचा वसा, लवकरच होणार रुजू, सध्या सुरु आहे औरंगाबादला प्रशिक्षण

 The 'daring' of the daughter of Kalamdu, the steering of the bus in hand | कळमडूच्या कन्येची ‘डेअरिंग’, हाती बसचे स्टेअरिंग

कळमडूच्या कन्येची ‘डेअरिंग’, हाती बसचे स्टेअरिंग

Next

कैलास अहिरराव
कळमडू, ता.चाळीसगाव : आजकाल महिलांसाठी भरारी घेण्यास अवघे आकाशच खुले झाले आहे. सर्वच क्षेत्रे महिला पादाक्रांत करीत आहेत. मात्र स्वत: डीएड पदवीधारक असताना शिक्षकी पेशा न स्वीकारता पती पाठोपाठ पत्नीनेही राज्य परिवहन महामंडळात चालक-वाहक पदाची नोकरी धरली. मूळच्या कळमडू (ता.चाळीसगाव) येथील कन्या असलेल्या शुभांगी कारभारी केदार (मोरे) यांना महिला एसटी बस वाहक-चालक होण्याचा मान मिळाला आहे. त्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला बस चालक ठरल्या आहेत.
ग्रामीण भागात धुराळा उडवत धावणारी एसटी बस अर्थात लालपरीची नाळ तेथील जनतेशी जुळलेली आहे, हे नव्याने सांगणेच नको. आता कळमडूसारख्या गावातून शुभांगी केदार यांना एसटीत मिळालेली संधी; तीदेखील पती-पत्नी यांना एकाच वेळी हा एक योगायोग व ही नाळ अधिकच घट्ट जुळणारी ठरणार आहे...
महावितरणमध्ये नोकरीस असलेले येथील कारभारी शेनपडू केदार यांची शुभांगी ही कन्या. तिचा विवाह तालुक्यातील वडगाव-लांबे येथील सूरज अशोक मोरे यांच्याशी झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागासाठी वाहक-चालक अशी एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली. दोघेही पती-पत्नी यांनी या पदासाठी अर्ज केले. खरं तर शुभांगी डीएड पदविका व कला पदवीधारक आहे. ती शिक्षिका म्हणून खासगी शिक्षण संस्थेत नोकरी करू शकली असती. पतीसोबतच एसटीत नोकरीचा वसा तिनेही स्वीकारला.

-वडिलांकडे अगोदरच चारचाकी वाहन असल्याने शुभांगीला तो लाभ एसटीतल्या या पदासाठी झाला. पती-पत्नी दोघेजण एकाचवेळी या पदासाठी पात्र ठरत त्यांची निवड झाली.

- सध्या शुभांगीचे वाहक म्हणून प्रशिक्षण संपले आहे. चालक म्हणून औरंगाबाद येथे ती प्रशिक्षण घेत आहे. लवकरच ती पती सूरज मोरे यांच्या जोडीने जळगाव विभाग नियंत्रकात वाहक-चालक म्हणून एसटी बसची स्टेअरिंग हाती घेत रस्त्यावरुन धावू लागेल. तेव्हा तिच्यातील धाडसाला आपसूकच सलाम ठोकला जाईल. तिचा नुकताच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या हस्ते सन्मानदेखील झाला. पती अन् पत्नी असे दोघेही लालपरीचे धुरकरी झाल्याचे हे अपवादात्मक उदाहरण ठरावे.

 

Web Title:  The 'daring' of the daughter of Kalamdu, the steering of the bus in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.