भुसावळ तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:20 PM2018-09-17T14:20:08+5:302018-09-17T14:21:08+5:30

नजर पैसेवारी मात्र ६१ टक्के : जिल्ह्यातून तालुक्यात सर्वात कमी ४९ टक्के पाऊस

Dark drought on Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट

भुसावळ तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट

googlenewsNext
ठळक मुद्देपाऊस ४९ टक्के, तर नजर पैसेवारी ६१ टक्केशासनाने बांधलेले ११२ शेततळे पाझर तलाव, नदीनाले अद्यापही कोरडेठाक

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात यावर्षी जिल्ह्यातून सर्वात कमी केवळ ४९.६५ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या २४ दिवसापासून पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे तालुका दुष्काळाच्या छायेत आहे . तरीही महसूल प्रशासनाने १६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या नजर पैसेवारीच्या प्रस्तावात तब्बल ६१.३७ टक्के नजर पैसेवारीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी संकटासोबतच महसुली संकटात सापडला आहे.
तालुक्यात यावर्षी शहरात ३ जून रोजी ४.५ मि.मी. व ७ जून रोजी १६ मि.मी. पाऊस पडला होता. हा पाऊस केवळ शहरात पडला होता, तर १९ जूनपासून संपूर्ण तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पिकांना दिलासादायक पाऊस पडला होता. आॅगस्ट महिन्यात मात्र पावसाने प्रथम १२ आॅगस्टपर्यंत त्यानंतर २५ आॅगस्टपासून पुन्हा दडी मारली. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी फुलोऱ्यात व वाढमध्ये असताना पाऊस बेपत्ता झाल्यामुळे त्याचा फार मोठा फटका बसला. याचा उत्पन्नावर मोठा परिणाम झाला.
तालुक्यात आतापर्यंत ३३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०० टक्के पावसाच्या नोंदीसाठी ६६९.२० पावसाचे प्रमाण करण्यात आले आहे. त्यामुळे ५० टक्के ही पाऊस पडला नसताना महसूल विभागाने तब्बल ६१.३७ टक्के नजरपैसे वारी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी संकटात सोबतच महसुली संकटातही सापडला आहे.
तालुक्यात भुसावळ, वरणगाव, पिंपळगाव व कुºहे (पानाचे) असे चार महसुली सजे आहेत. या सजांचा विचार केला तर पावसाळ्याच्या आतापर्यंत १०७ दिवसांपैकी भुसावळ शहरात ४२ दिवस पावसाने हजेरी लावली आहे, तर वरणगाव सजामध्ये ३४ दिवस, पिंपळगाव सजामध्ये २३ दिवस व कुºहे (पानाचे ) सजामध्ये २६ दिवस एवढेच हजेरी लावली आहे. त्यातही काही गावांमध्ये एक मि.मी.वर काही गावांमध्ये दोन मिलिमीटर तर काही गावांमध्ये केवळ पाच मिलिमीटर असा अल्पसा पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यात नदी नाल्यांना पूर तर सोडाच थोडेफार पाणी आले नाही. त्यामुळे शासनाने बांधलेले ११२ शेततळे पाझर तलाव, नदीनाले अद्यापही कोरडेठाक पडले आहेत. पाण्याची पातळी तळाला असल्यामुळे शेतकरी वर्ग रब्बी तर सोडाच खरीप हंगाम घेऊ शकत नसल्यामुळे पूर्णपणे दुष्काळाच्या संकटात सापडला आहे.


 

Web Title: Dark drought on Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.