दिवसा सुरू राहणारे पथदिवेच काढल्याने अनेक भागांत अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:20+5:302021-07-10T04:12:20+5:30

भुसावळ : शहरात अनेक ठिकाणी दिवसाही पथदिवे सुरूच राहात असल्याच्या तक्रारी आल्यावर, त्यासंबंधी नियोजन करण्याऐवजी ‘ते’ पथदिवेच काढण्याचा अजब ...

Darkness in many areas due to daytime streetlights | दिवसा सुरू राहणारे पथदिवेच काढल्याने अनेक भागांत अंधार

दिवसा सुरू राहणारे पथदिवेच काढल्याने अनेक भागांत अंधार

Next

भुसावळ : शहरात अनेक ठिकाणी दिवसाही पथदिवे सुरूच राहात असल्याच्या तक्रारी आल्यावर, त्यासंबंधी नियोजन करण्याऐवजी ‘ते’ पथदिवेच काढण्याचा अजब कारभार शहरात झाला आहे. यामुळे अनेक भागांत ‘अंधार’ निर्माण झाला आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

शहरात नगरपालिका, महावितरण व पथदिव्यांचे कंत्राट घेतलेल्या इइएसएल कंपनीच्या कारभारामुळे भरदिवसा अनेक ठिकाणी पथदिवे सुरूच होते. याबाबत अनेक वेळेस महावितरण, नगरपालिका प्रशासनास भुसावळ शहर शिवसेनेतर्फे तक्रारी करण्यात आल्या होत्या. परिणामी, गुरुवारी कन्झ्युमर लाइनवरून वीज जोडणी केलेली असल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी थेट पथदिवेच काढून घेतले.

नागरिकांना नाहक त्रास

दिवे काढल्याने नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो आहे. शहरातील ५० पेक्षा जास्त गल्ल्या अंधारात आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी नगरपालिकेचे वीज अभियंता सूरज नारखेडे आणि इइएसएल कंपनीच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. समन्वयातून हा प्रश्न मार्गी लावून पथदिवे पुन्हा सुरू करावे, नवीन स्ट्रीट लाइट लाइनसाठी नियोजन करावे, शक्य असल्यास सर्व ठिकाणी टाइमर बसवावे, अशा सूचना बऱ्हाटे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. उपशहर संघटक नबी पटेल, विक्की चव्हाण यांनी घडलेला प्रकार अधिकाऱ्यांच्या समोर मांडला.

कंदील लावून आंदोलन करणार

भुसावळ शहरातील पथदिवे वेळेत सुरू आणि वेळेत बंद न झाल्यास, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ नगरपालिकेच्या समोर कंदील लावण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पथदिव्यांच्या समस्यांबाबत संबंधितांशी चर्चा करताना शिवसेनेचे पदाधिकारी. (वासेफ पटेल)

Web Title: Darkness in many areas due to daytime streetlights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.