झेडटीसी परिसराला जोडणाऱ्या बोगद्यात अंधार, अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 03:47 PM2021-02-17T15:47:04+5:302021-02-17T15:47:16+5:30
झेडटीसी परिसराला जोडणाऱ्या बोगद्यात अंधार आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
भुसावळ : झेडटीसी परिसराला जोडणारा बोगदा काही दिवसांपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पूर्ण काम झालेले नसताना हा बोगदा खुला करण्यात आला. सध्या या बोगद्यात अंधार आहे. यामुळे येथे काळोख पसरला असून, अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बोगद्यात अंधार असल्यानेही अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे या बोगद्यात रात्री अंधार राहात असून चोरी, लुटमार, विद्यार्थिनी व महिलांसोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तक्रार वाहनचालकांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्याकडे केली.
रेल्वेने बांधलेल्या या बोगद्याचे अंतर २०० मीटरपेक्षा जास्त आहे. आतमध्ये अजूनही दिवे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे बोगद्यातील काळोखातून वाहने ये-जा करतात. अंधार असल्याने पुढची वाहने दिसत नाहीत. अचानक ब्रेक लावल्यास मागून आलेली वाहने धडकण्याची शक्यता असते. अंधारात वेग कमी जास्त करण्याससुद्धा वाहनचालकांना अडचणी येत आहेत. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन बोगद्यातील दिवे चालू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
तालुक्यातील भुसावळ, वरणगाव व इतर परिसरात ये जा करण्यासाठी हा मार्ग रेल्वे कर्मचारी, ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी, आर्मी जवान, विद्यार्थी, महिला व नागरिक वापरतात. काम अपूर्ण असतांना बोगदा खुला करायला नको होता, वाहनचालकांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने त्वरित दिवे लावावेत अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.