उघड्या डीपीमध्ये साक्षात ‘यमराजा’चे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:12+5:302021-01-13T04:38:12+5:30
जळगाव : शनिवारी सायंकाळी नवीन बस स्थानकासमोर असलेल्या उघड्या डीपीत एका व्यक्तीने हात टाकून, आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरातील उघड्या ...
जळगाव : शनिवारी सायंकाळी नवीन बस स्थानकासमोर असलेल्या उघड्या डीपीत एका व्यक्तीने हात टाकून, आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरातील उघड्या डीपींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महावितरणतर्फे खबरदारी म्हणून फक्त मुख्य रस्त्यांवरीलच डीपी बंद ठेवल्या असून, नागरी वस्ती असलेल्या गल्ली-बोळीतील डीपी या उघड्याच ठेवल्या असल्याचे धक्कादायत चित्र रविवारी `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून आढळून आले.
विद्युत पुरवठ्यासाठी महावितरणतर्फे बसविण्यात आलेल्या डीपींच्या देखभाल व दुरुस्तीकडे महावितरणचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. काही महिन्यांपूर्वी उघड्या डीपीच्या आजूबाजूला विद्युत प्रवाह उतरल्यामुळे एका म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. तर शनिवारी बस स्थानकासमोरील उघडी डीपी पाहून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. महावितरणतर्फे शहरातील नवीन मुख्य रस्त्यांवरील डीपीचीच देखभाल करण्यात येत असून, खबरदारी म्हणून या डीपी नेहमी बंद ठेवण्यात येत आहेत. तर गल्ली-बोळीतील डीपी उघड्यावरच आहेत. विशेष म्हणजे शनिपेठ, बळीरामपेठ व पोलन पेठ भागातील अत्यंत दाटीवाटीच्या गल्ली-बोळींमध्ये अनेक डीपी उघड्या दिसलेल्या दिसून आल्या.
शनीपेठ :
शनिपेठ पोलीस स्टेशनच्या शेजारीच असलेली डीपी उघडी असलेली दिसून आली. तर डीपीच्या खाली विद्युत ताराही लोंबकळत होत्या. विशेष म्हणजे परिसरातील लहान मुले रस्त्यावरच खेळत होती. जर अनावधाने खेळता-खेळता एखादी बालक डीपीकडे गेला, तर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता दिसून आली. तसेच शनीपेठेतच एका घराला लागून एक डीपी उघडी दिसून आली. विशेष म्हणजे या डीपी नेहमी उघडल्याचे असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
बळीराम पेठ, दाणा बाजार परिसर :
सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या या परिसरातही दोन ठिकाणी उघड्या डीपी दिसून आल्या. बळीराम पेठेत तर लेंडी नाल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच उघडी डीपी आहे. रस्त्यावर वर्दळ झाल्यास अनेक नागरिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अगदी डीपी जवळून दुचाकी काढतात. तर या उघड्या डीपीमुळे या ठिकाणी विजेचा धक्का लागण्याची दाट शक्यता दिसून आली. तसेच दाणा बाजार परिसरातही रस्त्याच्या मधोमध असलेली डीपी उघडी दिसून आली.
चित्रा चौक परिसर :
या चौकातही नेरी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डीपी उघडी असलेली दिसून आली. डीपी उघडी असल्यामुळे डीपीचे लोखंडी फाटक वाहन धारकांना लागण्याची दाट शक्यता दिसून आली. असे असतानांही महावितरणचे या डीपीकडे सपशेल दुर्लक्षच झालेले दिसून आले.