दोन वर्षांपासून पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलासाठी ‘तारीख पे तारीख’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:57+5:302021-04-16T04:14:57+5:30
पुलाची अंदाजित लांबी - ५०० मीटर रुंदी - ८ मीटर आर्मची लांबी - १२० मीटर पुलाला अंदाजित खर्च - ...
पुलाची अंदाजित लांबी - ५०० मीटर
रुंदी - ८ मीटर
आर्मची लांबी - १२० मीटर
पुलाला अंदाजित खर्च - ४५ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यासोबतच वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता वाहतूक कोंडीची समस्यादेखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे, अशा परिस्थितीत शहराच्या दृष्टीने शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासोबतच पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचीदेखील शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र, मंजुरी मिळून दोन वर्ष पूर्ण होऊनदेखील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे राज्य शासनाकडून या कामासाठी १० कोटी रुपयांचा पहिला हप्तादेखील महारेलला देण्यात आला आहे. केवळ मनपा प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे तब्बल दोन वर्षांपासून या पुलाचे काम रखडले आहे.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा करून पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल मंजूर करून घेतला होता. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या पुलासाठी लागणारा खर्च राज्य शासन व रेल्वे प्रशासनाकडून घेण्याचा प्रस्तावदेखील निश्चित करण्यात आला होता. मात्र दोन वर्ष होऊनदेखील या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाही. महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या पुलाच्या कामाला आतापर्यंत सुरुवात झालेली नसल्याची माहिती रेल्वे व बांधकाम विभागाचा अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. या पुलाअंतर्गत भोईटे नगरकडून आर्मची व्यवस्था करण्याबाबत महापालिका प्रशासन आग्रही होते. तर रेल्वे प्रशासनाने आर्मसाठी नकार दिला होता. आर्मऐवजी रेल्वेने नवीन बजरंग बोगद्याला लागून समांतर बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला होता. मात्र महापालिका प्रशासन आर्मबाबतच ठाम होते. काही वर्षांनंतर आर्मला मंजुरी मिळाल्यानंतरदेखील कामाला सुरुवात झालेली नाही.
भूसंपादनाची प्रक्रिया रखडली
या पुलाचे काम रेल्वेच्या महारेल या कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. महापालिकेचा हट्टा नंतर या पुलालगत भोईटे नगरकडून येणाऱ्या आर्ममुळे या भागातील काही मालमत्ता बाधित होणार आहेत. यामुळे महापालिकेला या बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागणार आहे. मात्र महापालिकेकडून दिली जाणारी रक्कम ही संबंधित मालमत्ताधारकांना मंजूर नाही. त्यामुळे भूसंपादनाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. हे काम रखडल्याने पुलाच्या कामालादेखील सुरुवात होऊ शकत नाही. भोईटे नगर भागातील तीन मालमत्ता यामुळे बाधित होणार आहेत, यासाठी महापालिकेने ३ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र तीन महिन्यांपासून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.
असा होणार पूल
१. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आराखड्यानुसार कानळदा रस्त्यालगतच्या एस.के. ऑईल मीलकडून थेट रिंगरोडपर्यंत हा उड्डाणपूल तयार
करण्यात येणार आहे.
२. सुरत रेल्वे लाईन व मुंबई रेल्वे लाईनवरून हा पूल होणार आहे
३. भोईटेनगर भागाकडूनही पुलावरून नागरिकांना ये-जा करता येणार आहे.
४.रेल्वेच्या महारेल या कंपनीकडून हा पूल तयार करण्यात येणार असून, आर्मचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र यासाठीची भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाही.
कोट..
आर्मसाठी ज्या मालमत्ता बाधित होणार आहेत. त्या मालमत्ताधारकांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी तडजोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूसंपादन कायद्याप्रमाणे तडजोड केली तर यासाठी बराच काळ वाया जाऊ शकतो. यामुळे संबंधित मालमत्ताधारकांची चर्चा सुरू असून यावर व्यवस्थित तडजोड झाल्यानंतर आर्मचा प्रश्न मार्गी लागेल.
- सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपा