दत्तात्रय कराळेच नाशिक ‘आयजी’, ‘एलसीबी’चा प्रभारी ठरेना !
By सुनील पाटील | Published: June 3, 2024 04:35 PM2024-06-03T16:35:34+5:302024-06-03T16:38:25+5:30
स्वतंत्र आदेश निर्गमित,जळगावात स्पर्धा कायम.
सुनील पाटील, जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचीच नियुक्ती झाली आहे. राज्याच्या गृह विभागाने सोमवारी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले. डॉ.बी.जी.शेखर पाटील सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी सीआयडीचे रंजन कुमार शर्मा यांची नियुक्ती झाली होती. दोनच दिवसात कराळेंबाबत स्वतंत्र आदेश झाले. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अजून ठरलेला नसला तरी याच आठवड्यात ही नियुक्ती होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच अर्थात फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या गृहमंत्रालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात डॉ.बी.जी.शेखर पाटील यांची पुणे येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी ठाणे येथील सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, या आदेशाविरुध्द शेखर यांनी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली होती. कॅटने शेखर यांचा अर्ज वैध ठरवून त्यांनाच कायम केले होते.आता ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्याजागी कराळेच पदभार घेतील असे सांगितले जात असतानाच रंजन कुमार शर्मा यांची तात्पुरती नियुक्ती शासनाने केली होती, त्यामुळे कराळे यांची नियुक्ती होते की नाही की अन्य दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते किंवा शर्माच कायम राहतात याबाबत उत्सुकता होती.
सोमवारी आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसाठी (एलसीबी) एमआयडीसीचे निरीक्षक बबन आव्हाड, जामनेरचे निरीक्षक किरण शिंदे, सध्या धुळ्यात कार्यरत असलेले निरीक्षक जयपाल हिरे व आताच जळगावात बदलून आलेले प्रदीप ठाकर यांच्या नावाची चर्चा आहे.