थ्रेशरमध्ये पदर अडकून महिलेचा मृत्यू
By admin | Published: April 22, 2017 12:13 AM2017-04-22T00:13:33+5:302017-04-22T00:13:33+5:30
देऊळगाव गुजरी येथील दुर्घटना: गळ्याला बसला फास
जामनेर : साडीचा पदर थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने महिलेच्या गळ्याला फास बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे घडली. या महिलेसोबत तिचा पतीदेखील शेतात थ्रेशरवर मका काढणीचे काम करीत होता.
फातेमा साहेबखा तडवी (वय-३५) असे मृत महिलेचे नाव असून ती थ्रेशरवर मका काढणीचे काम करीत असताना थ्रेशरमध्ये साडीचा पदर अडकल्याने ती आत ओढली गेली व थ्रेशरच्या बेल्टचा तिच्या गळ्यास फास लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना जामनेरला हलविण्याचे सांगितले. येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला आणले असता डॉ. वैशाली चांदा यांनी त्यांना मृत घोषित केले.
फातेमा तडवी यांचे पती साहेबखा तडवी यांना पत्नीच्या मृत्यूची माहिती कळताच ते बेशुद्ध झाले. त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. साहेबखा तडवी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे. पं.स.च्या माजी उपसभापती सायरा चिमन तडवी यांची ती पुतणी होती. उपजिल्हा रुग्णालयात मयताचे नातेवाईक शोक व्यक्त करीत होते.