घर भाड्याचे पैसे पतीनं सासूला दिल्याचा राग; सुनेनं आवळला सासूचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:55 PM2019-05-13T22:55:36+5:302019-05-13T22:56:41+5:30
जळगावातील धक्कादायक घटना
जळगाव- घर भाड्याचे पैसे पतीने सासूला दिल्याचा राग आल्याने सुनेने इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सायंकाळी जुने जळगावातील भोई वाड्यात घडली. याप्रकरणी सून दीपाली लक्ष्मण कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनाबाई काशिनाथ कोळी यांनी त्यांच्या मालकीची काही घरे भाड्याने दिली आहेत. मुलगा लक्ष्मण याने या घराच्या भाड्याचे पैसे जमा करून आईकडे दिले. त्यामुळे लक्ष्मण याची पत्नी दीपाली हिने सासू मिनाबाई यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. याचवेळी दीपाली हिने जवळ असलेली इलेक्ट्रीकची वायर आणून सासूचा गळा आवळला. यात सासू अत्यवस्थ झाल्याने मुलगा व परिसरातील महिलांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी सकाळी शनीपेठ पोलिसांनी मीनाबाई यांचा जबाब नोंदवून सून दीपाली हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.