दौलत नगर आणि खेडी दरोडा तर सावखेडा खुनाचा तपास थंडावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:16 AM2021-04-11T04:16:26+5:302021-04-11T04:16:26+5:30
धागेदोरे नाहीच : गंभीर गुन्हे घटले जळगाव : सावखेडा शिवारात अमदपूर व्यक्तीचा झालेला खून, दौलत नगरातील पिंटू इटकरे तसेच ...
धागेदोरे नाहीच : गंभीर गुन्हे घटले
जळगाव : सावखेडा शिवारात अमदपूर व्यक्तीचा झालेला खून, दौलत नगरातील पिंटू इटकरे तसेच खेड येथे योगेश जगनो भोळे यांच्याकडे झालेला दरोडा या तीन गंभीर गुन्ह्यांचा तपास थंडावला असून दोन महिन्यांत पोलिसांना कुठलेच धागेदोरे मिळालेले नाहीत. खुनाच्या घटनेला तर सहा महिन्यांच्या वर कालावधी झालेला आहे .
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारी रोजी रात्री नंदुरबार पोलीस दलात अंमलदार असलेल्या योगेश भोळे यांच्या आईवडिलांच्या डोक्यात बॅट मारून ४० हजारांची रोकड तसेच साखरपुड्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. त्याशिवाय त्याच रात्री या भागात चार ठिकाणी अशीच घटना घडली होती. त्याआधी तीन फेब्रुवारी रोजी पहाटे मोहाडी रस्त्यावर पिंटू बंडू इटकरे यांच्याकडे २३ लाखांचा सशस्त्र दरोडा पडला होता. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास केला. तंत्रज्ञानाचाही या गुन्ह्यांत आधार घेण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत कुठलाच पुरावा किंवा माहिती पोलिसांना मिळाली नाही.
दरम्यान,गे ल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात मालमत्ता तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे घटलेले आहेत. मोबाईल, दुचाकी व सोनसाखळी लांबविण्याच्या घटना मात्र वाढलेल्या आहेत. मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येत असताना इतर घटना मात्र उघडकीस येत नाही.
*त्या खुनातील मृतदेहाची ओळख पटलीच नाही*
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावखेडा शिवारात ६ ऑक्टोबर रोजी ४० ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी प्राथमिक स्तरावर अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. शवविच्छेदन अहवालानंतर ही घटना खुनाची असल्याचे स्पष्ट झाले होते, त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला सहा महिने पूर्ण झालेले आहे. यात खून कोणी केला यापेक्षाही खून कोणाचा झालेला आहे, मयत व्यक्ती कोण आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.
* * * * * * * * * * * * * * *गुन्हे दाखलचे प्रमाण वाढले*
गुन्ह्यांच्या आकडेवारीत वाढ झालेली दिसत असली तरी त्यात सर्वाधिक गुन्हे मोबाईल व दुचाकी चोरीचे आहेत. पूर्वी असे किरकोळ गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होते, मात्र डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस अधीक्षकपदाचा पदभार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आलेली प्रत्येक तक्रार नोंदवलीच गेली पाहिजे म्हणून त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना कडक सूचनावजा आदेश दिले. एखादी तक्रार उशिरा नोंदविली गेली असेल तरी त्या प्रभारी अधिकाऱ्याला जाब विचारला जातो. गुन्हा दाखल झाला तर त्याचा तपास करणे क्रमप्राप्त ठरते, मात्र गुन्हा दाखलच झाला नाही तर तपास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे गुन्हेगारांची असे गुन्हे करण्याची हिंमत आणखीनच बळावते. याच मुद्द्याला स्पर्श करून डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुन्हे दाखलचे प्रमाण वाढवले.