गिरणा नदीपात्रातच वाळू माफियांमध्ये दे-दणादण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:06+5:302021-02-15T04:15:06+5:30
जळगाव : ठेकेदाराच्या माणसाने अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर अडविल्याच्या कारणावरुन नागझिरी, ता.जळगाव येथील गिरणा नदीपात्रातच दोन्ही गटात जोरदार ...
जळगाव : ठेकेदाराच्या माणसाने अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर अडविल्याच्या कारणावरुन नागझिरी, ता.जळगाव येथील गिरणा नदीपात्रातच दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली. यात ठेकेदाराचा कर्मचारी हमीद अब्बास खाटीक (४३,रा.हुडको पिंप्राळा) व गोपाळ गायकवाडे हे जखमी झाले असून याप्रकरणी सतीष तायडे, कपील सोनवणे, हेमंत व भावड्या या चौघांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हमीद खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टाकरखेडा, ता.एरंडोल येथील गट क्र.१ ते ४ चा वाळू ठेका व्हि.के.एन्टरप्रायजेसचे विलास काळू यशवंते (रा.जळगाव) यांनी घेतलेला आहे. या ठेक्यावरुन वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पावती पाहून सोडण्याचे काम खाटीक यांच्याकडे आहे. रात्री ८ ते सकाळी ८ अशी त्यांची ड्युटी असते. रविवारी पहाटे ४ वाजता जयेश पुंडलिक सपकाळे, गोपाळ माधव गायकवाड असे ड्युटीवर असताना गिरणा नदीपात्रात ट्रॅक्टरचा आवाज आल्याने नागझिरी शिवारात ट्रॅक्टर अडविले व चालकाकडे पावती मागितली असता त्याने पावती नसल्याचे सांगितले. मालकाचे नाव सतीश तायडे असे सांगितले. नंतर थोड्यावेळाने तायडे, कपील सोनवणे, हेमंत व भावड्या असे तेथे आले व सर्वांनी शिवीगाळ करुन ट्रॅक्टरमधील लाकडी दांडके काढून सर्वांना मारहाण केली. भावड्या याने गोपाळ गायकवाड याच्या डोक्यात तर कपील याने खाटीक याच्या डोक्यात दांडका टाकला. खाली पाडून बेदम मारहाण केली. यावेळी चालक वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेऊन पसार झाला तर इतरही दुचाकीने निघून गेले. या घटनेनंतर अनिल देशमुख यांना माहिती दिली, त्यांनी जखमींना शासकीय वैद्यकिय रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी चौघांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.