स्मशानभूमीत नेलेला मृतदेह रुग्णालयात थेट आणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:18 PM2021-01-05T23:18:48+5:302021-01-05T23:19:20+5:30
संशयास्पद मृत्यू; गळ्यावर व्रण दिसल्याने रोखले अंत्यसंस्कार
जळगाव: टीबीचा आजार असलेल्या योगेश वसंत अत्तरदे (40, रा. एमडीस काॅलनी मेहरून) या तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. रात्री आठ वाजता मेहरुण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु असतानाच त्याच्या गळ्यावर व्रण दिसून आल्याने संशय व्यक्त करुन पत्नी व इतर नातेवाईकांनी मृतदेह तेथून थेट जिल्हा रुग्णालयात आणला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,योगेश अत्तरदे या तरुणाला टीबीचा आजार होता. गेल्या 9 महिन्यापासून तो बेपत्ता होता.दहा दिवसांपूर्वीच तो घरी परतला. प्रकृती खराब असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने चार दिवसापूर्वी डॉक्टरांनी त्याला घरी सोडले होते. मंगळवारी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. आई, भाऊ यांनी त्याच्या मृत्यूची माहिती माहेरी गेलेल्या पत्नीला देऊन रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविले. त्यानुसार नातेवाईक दाखल झाले. मृतदेह मेहरुंणच्या स्मशानभूमीत नेल्यावर पत्नीकडे काही लोकांनी चेहरा उघडून दाखवण्याची मागणी केली असता, त्यास भावाने विरोध दर्शविला, त्यामुळे इतरांना संशय बळावला पत्नीच्या आग्रहामुळे चेहरा उघडला असता योगेशच्या गळ्यावर फाशी दिल्याचे व्रण दिसून आले. नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन घटनेची माहिती कळविण्यात आली रात्री उशिरापर्यंत झालेले नव्हते पोलीस चौकशी करीत होते. झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल योगेश त्याच्या पश्चात पत्नी सपना आई भाऊ व मुलगी असा परिवार आहे याबाबत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नव्हती. दरम्यान योगेश याने गळफास घेतला असावा अशी शक्यता पोलीस व डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.