आयपीएल सट्टा प्रकरणातील घनश्याम अग्रवाल यांच्याकडून हवाल्याचाही व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:59 PM2018-05-09T12:59:45+5:302018-05-09T12:59:45+5:30
पोलीस तपासात उघड
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - आयपीएलच्या २०-२० क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या टोळीचे प्रमुख सूत्रधार चोपड्यातील भाजपा नेता घनश्याम अग्रवाल हे हवाल्याचाही व्यवहार करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अग्रवाल हे कोणाकडून सट्टा घेत होते व कोणाला देत होते याची साखळी कशी आहे, याचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.
खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोधीवली नजीक असलेल्या साई इन लॉजिंग या हॉटेलच्या २०१ क्रमांकाच्या खोलीत रायगड व पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली होती. तेथे विक्रम वारसमल जैन, नरेश रामस्वरुप अग्रवाल, नवीन बाळकृष्ण अग्रवाल, दीपक दौलतराम कृपलानी, नदीम मैमुद्दीन पठाण हे पाच सट्टेबाज दिल्ली डेअरविल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यावर सट्टा चालवत असल्याचे रंगेहाथ सापडले होते. त्यांच्याकडे झालेल्या चौकशीत सट्टेबाजांचा म्होरक्या घनश्याम अग्रवाल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार शनिवारी खालापूर पोलिसांनी चोपड्यातून अग्रवाल यांना अटक केली होती. न्यायालयाने अग्रवाल यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने अग्रवाल यांना बुधवारी खालापूर न्यायालयात हजर केले जाणार आहे.
आरोपींची संख्या वाढणार... या गुन्ह्यात आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती खालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक खलील शेख यांनी ‘लोकमत’ ला दिली. अग्रवाल यांच्या आयपीएल सामन्यावरील सट्ट्याची साखळी कशी?, कोण त्यांना सट्टा द्यायचे, त्यानंतर पैशाचा व्यवहार कसा, अग्रवाल यांच्यावर कोण बुकी आहे. या सर्वांची नावे निष्पन्न झाली आहेत, त्यांना लवकरच अटक होणार असल्याचे शेख यांनी सांगितले. या चार दिवसाच्या पोलीस कोठडीत अग्रवाल हवाल्याचाही व्यवहार करीत असल्याचे उघड झाल्याची माहिती शेख यांनी दिली.