आपसातील वादामुळे डीन डॉ.खैरे यांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:21 PM2020-05-23T12:21:52+5:302020-05-23T12:22:02+5:30
तक्रारीनंतर पदावरून हटविले : तीन वर्ष दिली सेवा, नव्या डीनकडून मोठ्या अपेक्षा
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्या जागेवर नियमित अधिष्ठाता म्हणून डॉ़ मिनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ मात्र, खैरे यांना कुठे नियुक्ती देण्यात आली. याबाबत कुठलेही आदेश अद्याप प्राप्त नाहीत, दरम्यान, त्यांना पदावरून हटविण्यामागे अधिकाऱ्यांमधील वाद व वाढलेला मृत्यूदर व तक्रारी या बाबींची किनार असल्याचे समोर येत आहे़ काही दिवसांपूर्वी या मुद्द्यांवरून सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली होती़
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले अधिष्ठाता या पदावर डॉ़ भास्कर खैरे यांची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांच्या कार्यकाळात चिंचोली परिसरात एकात्मीक वैद्यकीय संकुल उभारणीला मोठी चालना मिळाली. या ठिकाणी मोठे मेडिकल हब उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे़ त्यात जळगावात कोरोना संसर्ग वाढल्याने या संपूर्ण रुग्णालयालाच कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते़
अधिकाऱ्यांमधील वादाचीही किनार
शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांच्या वादात आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाल्याचा मुद्दा वारंवार मांडला जात होता़ याच मुद्दयावर जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या सभेतही वादळी चर्चा झाली होती़ लोकप्रतिनिधींनी अखेर कोविड रुग्णालयच दुसरीकडे हलवा असा आक्रमक मुद्दा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर मांडला होता़ तेव्हापासूनच बदलाचे वारे तीव्र झाले होते़ अधिकाºयांमधील हा वादही बदलीमागचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे़
लवकरच आणखी एक बदली?
कोरोनाने जळगावात पहिली मोठी बदली झाली असून येत्या एक दोन दिवसात रुग्णालय प्रशासनातील आणखी एका अधिकाºयाची बदली होणार असल्याचे मॅसेज शुक्रवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल होत होते़ त्यामुळे हे अधिकारी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे़
असे आहे आव्हान
जिल्ह्यातील मृत्यूदर वाढून मृत्यूची संख्या आटोक्यात आणणे, कोविड रुग्णालयातील असुविधांच्या बाबतीत आलेल्या तक्रारी, झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, मनुष्यबळाची कमतरता, अशी आव्हाने नवीन अधिष्ठाता डॉ़ मिनाक्षी गजभिये यांच्यासमोर राहणार आहेत़
वर्षभरात संस्था सुरू झाली त्यात योगदानाचे समाधान: डॉ़ खैरे
राज्यभरात अनेक ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणा झालेल्या होत्या, मात्र प्रत्यक्ष सुरू झालेले नव्हते़ जळगाव एकमेव ठिकाण असे आहे की त्या ठिकाणी घोषणा होऊन वर्षभरात शासकीय महाविद्यालय सुरू झाले़ या ठिकाणी आपली नियुक्ती झाली व या तीन वर्षात आपण यात योगदान देऊ शकलो याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया डॉ़ भास्कर खैरे यांनी ह्यलोकमतह्णला दिली आहे़ या तीन वर्षात जळगावकरांचे प्रेम मिळाले़ काम करण्याची संधी मिळाली़ माजी मंत्री गिरीश महाजन, विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्याची दखल घेतल्याचे ते म्हणाले.
सरकारने योग्य निर्णय घेतला आहे़ डॉ़ भास्कर खैरे यांच्या नेतृत्वात कोविड रुग्णालयात कुठलेच नियोजन होत नव्हते़ मृत्यदर नियंत्रणात येत नव्हता़ त्यामुळे नवीन येणाºया अधिष्ठाता यांच्या नेतृत्वात कोविड रुग्णालयात सुविधा मिळतील व मृत्यूदर कमी होईल, अशी अपेक्षा आहे़
-अभिषेक पाटील,
राष्ट्रवादी महानगराध्यक्ष
जिल्ह्यात गेल्या २० दिवसात प्रचंड संसर्ग वाढला आहे़ तब्बल ३८१ रुग्ण वाढले आहे़ ज्यावेळी शंभर रुग्ण होते, त्याचवेळी मी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना टिष्ट्वट करून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डीन यांच्या बदलीची मागणी केली होती़ त्यानुसार डीन यांची बदली झाली़ नवीन डीन चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे़ लॉकडाऊनच्या काळात नियमबाह्य सूट देण्यात आली त्यामुळे प्रचंड संसर्ग वाढला हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाले आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बदली व्हावी, अशी मागणी आहे़ तसे आश्वासनही मिळाले़
- योगेश देसले, प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस.