आंदलवाडी दंगलीतील आरोपीचा जळगाव कारागृहात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:49 PM2018-07-02T12:49:02+5:302018-07-02T12:49:26+5:30

मृतदेह धुळे येथे रवाना

Death of accused in Jalgaon jail in Andalwadi riots | आंदलवाडी दंगलीतील आरोपीचा जळगाव कारागृहात मृत्यू

आंदलवाडी दंगलीतील आरोपीचा जळगाव कारागृहात मृत्यू

Next
ठळक मुद्देरुग्णालय व कारागृह प्रशासनावर नातेवाईकांचा आरोपइनकॅमेरा झाला पंचनामा

जळगाव : रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे झालेल्या दंगलीतील न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी रवींद्र गंभीर कोळी (वय ४५, रा.आंदलवाडी, ता.रावेर) याचा रविवारी पहाटे साडे चार वाजता कारागृहात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालय व कारागृह प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे रवींद्र याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी मृतदेह दुपारी धुळे येथील वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आंदलवाडी येथे २४ मे रोजी दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटाच्या लोकांवर निंभोरा पोलीस स्टेशनला दंगल व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्णातील एका गटाच्या १५ जणांना २७ जून रोजी पोलिसांनी अटक केली.
रावेर न्यायालयाने त्याच दिवशी सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या संशयितांना २७ रोजी सायंकाळी जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. त्यात रवींद्र याचाही समावेश होता.
मानवाधिकार व न्यायालयाला जाणार अहवाल
कारागृह नियमावलीनुसार पाच डॉक्टरांच्या उपस्थितीत रवींद्र याच्या शवविच्छेदन होईल, त्यानंतर त्याचा अहवाल थेट मानवाधिकार आयोग व रावेर न्यायालयाला पाठविण्यात येईल, अशी माहिती कारागृह अधीक्षक श्री राव यांनी दिली. मृत्यू नेमका कशामुळे झाला तेदेखील शवविच्छेदन अहवालातच स्पष्ट होईल.
तीन वेळा बिघडली प्रकृती
कारागृहात आल्यानंतर रवींद्र कोळी याची दुसऱ्या दिवशी प्रकृती बिघडली. अत्यवस्थ वाटायला लागल्याने कारागृह प्रशासनाने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथे तात्पुरते उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात आणण्यात आले. शुक्रवारीही अशीच परिस्थिती होती. दवाखान्यात दाखल करुन घेणे गरजेचे असताना तेव्हाही त्याला परत पाठविण्यात आले. त्यामुळे शनिवारी पुन्हा अत्यवस्थ वाटायला लागल्याने परत जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचार केल्यानंतर दुपारी परत कारागृहात आणण्यात आले. सलग तीन दिवस कारागृह ते रुग्णालय असा प्रवास चालला.
रविवारी पहाटे मालवली प्राणज्योत
रवींद्र याला बॅरेल क्रमांक तीनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यासोबत त्याचे इतर नातेवाईकही होते. रविवारी पहाटे साडे तीन वाजता रवींद्रची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी हा प्रकार कारागृह रक्षकांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी १०८ या शासकीय रुग्णवाहिकेला कारागृहात बोलावले, मात्र रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांची प्राणज्योत मालवली होती. तेव्हा पहाटेचे साडे चार वाजले होते.
नातेवाईकांचा संताप अन् आरोप
रवींद्र याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्याचा भाऊ अनिल गंभीर कोळी, शालक शांताराम मकडू कोळी व अन्य नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठून कारागृह अधीक्षक श्री राव यांना मृत्यूबाबत जाब विचारला. त्यांनी उपचाराबातची माहिती व कागदपत्रे नातेवाईकांना दाखविले. रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले.
मृतदेह आणला जिल्हा पेठ पोलीस ठाण्याजवळ
जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रवींद्र यांचा मृत्यू झाल्याने दोषी असलेले डॉक्टर व अन्य संबंधीत व्यक्तीविरुध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी रवींद्र याचे भाऊ अनिल कोळी यांनी जिल्हा पेठ पोलिसांकडे केली. यावेळी त्यांनी लेखी तक्रार केली. नातेवाईक जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला असल्याने कारागृहातून मृतदेह घेऊन निघालेली शववाहिका थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणण्यात आली. तेथून धुळे येथे मृतदेह नेण्यात आला.
नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा
कारागृह नियमावलीनुसार कारागृहात मृत्यू झालेला बंदी किंवा कैदी याचा मृत्यू झाला असेल तर तहसीलदारांनी इनकॅमेरा पंचनामा करणे बंधनकारक असते. त्यानुसार रवींद्र कोळी यांचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदार अमोल निकम यांनी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांना प्राधिकृत केले होते. सातपुते यांनी दुपारी हा पंचनामा केला. त्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी पंचनामा केला. त्याचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले आहे.

रवींद्र हा कारागृहात आला त्या दिवसापासूनच आजारी होता. आम्ही वेळोवेळी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. आज सकाळी अचानक त्यांचा मृत्यू झाला. आम्ही यात कुठलीही कसर सोडलेली नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
-श्री राव, अधीक्षक, कारागृह

जिल्हा रुग्णालय व कारागृह प्रशासनामुळे भावाचा मृत्यू झाला आहे. प्रकृती खराब असतानाही डॉक्टरांनी त्यांच्यावर किरकोळ उपचार करुन पुन्हा कारागृहात पाठविले. रवींद्र यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी.
-अनिल कोळी, मयत रवींद्रचा भाऊ

Web Title: Death of accused in Jalgaon jail in Andalwadi riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.