अन्न व पाण्याअभावी काळवीटाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 08:42 PM2019-06-30T20:42:02+5:302019-06-30T20:42:08+5:30
दुर्लक्ष : उपचाराच्या प्रतीक्षेत सोडले प्राण
धरणगाव : तालुक्यात पावसाच्या दडीमुळे वन्यजीवांना अन्न व पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. २९ रोजी तालुक्यातील नारणे-कामतवाडी शिवारात दुपारी एक पूर्ण वाढ झालेले काळवीट यामुळे अत्यवस्थ आढळून आले. मात्र हा प्रकार गावकऱ्यांनी कळवूनही वनक्षेत्र अधिकारी वेळेवर न पोहचल्याने या काळविटाचा मृत्यू झाला. याबाबत वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित अधिकाºयावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यां सरोज पाटील व शिवराम पाटील यांनी केली आहे.
याबाबत वृत्त असेकी नारणे-कामतवाडी शिवारात शनिवारी दु १.२५ वा एक पूर्ण वाढ झालेले काळवीट अत्यवस्थ, व्याकूळ अवस्थेत आढळून आले होते. कदाचित त्यास भूक, तहान लागली असावी म्हणून नागरिकांनी त्यास चारा व पाणी दिले. मात्र ते खाऊ शकत नव्हते. याची दखल घेत येथील सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांनी आरएफओ बी. एस. पाटील यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला. पाटील यांनी येण्याचे आश्वासन दिले मात्र त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता एका वनरक्षकाला पाठवून काम धकवण्याचा प्रयत्न केला. या टाळाटाळीत व योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने काळविटाने दु. २.३० वा.प्राण सोडला. या अक्षम्य अपराधाबद्दल सरोज पाटील यांनी तिव्र नाराजी व्यक्त करुन वरीष्ठ अधिकाºयाशी संपर्क साधला. त्यानंतर संध्याकाळी वनविभागाचे वनरक्षकाने मृत काळवीट ताब्यात घेवून रात्रभर एरंडोल येथील कार्यालयात ठेवले.
आरएफओ बी.एस.पाटील यांनी वनरक्षक उमेश भारुळे, वनपाल पी. डी. पाटील, एस.एम.पाटील, एन.एम.क्षिरसागर यांचे सह मृत काळवीट एम.एच.१९- एम ९४२३ या वाहनाने धरणगाव तालुका पशु चिकित्सक दवाखान्यात आणले. तेथे डॉ. पी. व्ही. सोनवणे यांनी पोस्टमार्टेम करुन काळवीट वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
साळवा पशूचिकित्सक बेपत्ता...
साळवा केंद्रावर दिलेले पशू चिकित्सक प्रशांत पाटील आठ दिवसापासून गैरहजर असल्याचा आरोप सरोज पाटील व शिवराम पाटील यांनी केला. ते दवाखान्यात उपस्थित असते तर काळविटाचे प्राण वाचू शकले असते. त्यांची चौकशी करुन निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
बैठकीत होतो व्यस्त- आरएफओ
सदर घटनेबद्दल खुलासा करतांना आरएफओ बी. एस. पाटील यांनी सांगितले की, आपण शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेच्या तयारीत व्यस्त होतो असे ते म्हणाले. धुळ्याचे वरीष्ठ अधिकारी बैठकीला आलेले असल्याने आपण घटनास्थळी पोहचू शकलो नाही, असेही पाटील म्हणाले.